

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यावरून ठाकरे शिवसेनेत नाराजी आहे. आता तर या नाराजीतून पक्षातील खासदार फुटीच्या भीतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘मला तुमच्यावर भरोसा आहे; पण तुम्हाला लढायचे नसेल तर तसे सांगा, मी थांबतो,’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे सेनेचे खासदार फोडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या फोडाफोडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीत केवळ संघटनात्मक चर्चा झाली नाही, तर पक्षातील नाराजी, मतभेद आणि नेतृत्वाबाबतच्या अपेक्षा उघडपणे समोर आल्याचे बोलले जात आहे. बैठकीत खासदार फुटीवर उद्धव ठाकरे यांनी थेट भाष्य केले.
बैठकीदरम्यान, काही खासदारांनीदेखील आपापल्या अडचणी आणि नाराजी मोकळेपणाने मांडल्या. दरम्यान, ठाकरे सेनेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत व अनिल देसाई यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, उद्धव यांच्या या वक्तव्यामुळे बैठकीत काही काळ शांतता पसरल्याचेदेखील समजते.