डहाणू: वाणगाव बायपास रस्त्याचे काम रखडल्याने परिसरातील वाहतूक व्यवस्था धोकादायक बनली असून त्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. शुक्रवार ५ जून रोजी रेल्वे यार्ड परिसरात कुटुंबासोबत पायी जात असलेल्या एका तरुणीचा मालवाहतूक करणाऱ्या हायवा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
अपूर्ण बायपासमुळे अवजड वाहनांची गावातून होणारी वर्दळ आता नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी, विशेषतः वाढवण बंदर प्रकल्पासाठी दगड, मुरूम, माती आणि इतर खनिजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
ही अवजड वाहने वाणगाव रेल्वे स्थानक परिसरातून ये-जा करीत असल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे. मात्र, वाणगाव बायपासचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने या वाहनांना रेल्वे उड्डाणपूल उतरल्यावर तातडीने युटर्न घेऊन स्टेशनकडे वळावे लागते. पुलानंतरचे वळण अरुंद असल्यामुळे अवजड वाहनांना सहज वळण घेणे शक्य होत नाही.
त्यामुळे वाहनचालकांना वारंवार पुढे-मागे करून वाहने वळवावी लागतात. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. स्टेशन परिसरात अवजड वाहनांची वाढती वर्दळ असल्याने तासनतास वाहतूक ठप्प होत असून त्याचा फटका रेल्वेने प्रवास करणारे कामगार, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेकांना नियोजित रेल्वेगाड्या चुकण्याची वेळ येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, डहाणू यांच्या अखत्यारित वाणगाव बायपासचे काम सुरू आहे. जुन्या रस्त्याचे अस्तित्व असलेल्या आणि कांदळवनाचा अडथळा नसलेल्या भागातील काम जवळपास पूर्णत्वाकडे गेले आहे. मात्र, पुढील टप्प्यात कांदळवन क्षेत्र तसेच काही खाजगी जमिनींचा प्रश्न निर्माण झाल्याने आवश्यक परवानग्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या भागातील काम सध्या थांबले आहे.
दरम्यान, संबंधित सर्व विभागांनी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वाणगाव आयटीआय ते आसनगाव दरम्यानचा बायपास मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. बायपासचे काम पूर्ण झाल्यास गावातील वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाणही घटेल आणि यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.