खोडाळा: मोखाड्यात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा ऊडाला आहे. सदोष कामामुळे तालुक्यातील नळयोजना सपशेल अपयशी झाल्या आहेत. तालुक्यातील आसे ग्रामपंचायतीमधील भोवाडी आणि कुंडाचापाडा येथील आदिवसी महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या ऊन्हात पायपीट करावी लागत आहे.
आम्हाला पाणी द्या, आणि नळयोजनेचे सदोष काम करणाऱ्या कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई च्या मागण्यांसाठी आदिवासी महिलांनी आसे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्याने प्रशासनाचे धाबे दणाणले, प्रशासनाकडून येथे तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
तर नळपाणी पुरवठा योजनेच्या चौकशीचे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने दिले आहे. मोठा गाजावाजा करून केंद्र आणि राज्य सरकार ने आदिवासी भागातील महिलेच्या डोक्यावरील हंडा खाली आणण्यासाठी राज्यात जलजीवन मिशन योजना आणली.
मात्र, पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात या योजनेचा सपशेल बोजवारा ऊडाला आहे. कंत्राटदार आणि पाणी पुरवठा अधिकारी यांच्या संगनमताने, केंद्र आणि राज्य सरकार ची योजना बासनात गुंडाळली गेली आहे. पालघर जिल्ह्यात सर्वात भिषण पाणीटंचाई असलेल्या मोखाडा तालुक्यात या योजनेचे धिंडवडे निघाले आहेत.
मोखाड्यातील सर्वात भिषण पाणीटंचाई असलेल्या आसे ग्रामपंचायतीमधील शास्रीनगर नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने मे. 2023 मध्ये पुर्ण झाल्याची माहीती सरकारी अहवालात दाखवली आहे. त्या अंतर्गतच भोवाडी आणि कुंडाचापाड्याचा समावेश आहे. मात्र, येथे अजुनही नळाद्वारे पाणी पोहोचलेले नाही. परिणामी येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली ऊतरलाच नाही.
त्यामुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे. सदरची योजना अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन पुर्ण दाखवल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तालुक्यात सर्वत्र अशीच स्थिती आहे, यामधुन मोठी माया गोळा केली असून अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली.
यावर्षी भिषण पाणीटंचाई जाणवल्याने येथील महिलांना अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे पाणीटंचाई चा सामना करावा लागला आहे. या जाचाला कंटाळून महिलांचा संयम सुटला आणि अखेर आदिवासी महिलांनी ठिय्या आंदोलनाचे हत्यार ऊपसले. त्यांनी आसे ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावरच हंडामोर्चा काढुन ठिय्या आंदोलन केले.
शनिवारी 20. जुन ला संध्याकाळ पर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनात त्यांनी भोवाडीला टॅकरद्वारे पाणी पुरवठा तसेच सदोष नळयोजना करणाऱ्या दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी केली. आदिवासी रणरागीणींच्या या आंदोलनामुळे अखेर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासन नमले. त्यांनी तातडीने भोवाडीला तीन टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.
नळयोजनेच्या चौकशीचा मुद्दा ऐरणीवर..
ग्रामपंचायतीचे टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे पत्र आल्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, असे कुठलेही मागणी पत्र आलेले नसतांना, वरिष्ठांची परवानगी न घेता येथे सरकारी नियम धाब्यावर बसवून टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
जेथे नळयोजना आहे तेथे टॅकरद्वारे पाणी पुरवठा करता येत नाही, हे सरकारी धोरण ही अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या धसक्याने, अधिकाऱ्यांचा बचाव करण्यासाठी वेशीवर टांगले आहे. त्यामुळे या नळयोजनांच्या चौकशीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
येथील नळयोजनेमध्ये व्हाॅल्व चा तांत्रिक बिघाड आहे. दोन दिवसात तो दुरूस्त करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. येथील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात येथे तातडीने टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.- भाऊसाहेब चत्तर, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मोखाडा.