Wada Monsoon Fishing pudhari photo
पालघर

Wada Monsoon Fishing : पारंपरिक क्लुप्त्यांची चढणीची अनोखी मासेमारी तेजीत

वाड्यात पावसाच्या आगमनाने खवय्ये सुखावले

पुढारी वृत्तसेवा

वाडा : मच्छिंद्र आगिवले

मान्सूनच्या आगमनाने जितका शेतकरी सुखावला आहे तितकाच दरवर्षी चातकासारखी वाट बघत बसलेला पारंपरिक मासेमार व खवय्ये आनंदी झाले आहेत. तब्बल पाच नद्यांचा शेजार लाभलेला वाडा तालुका निसर्ग संपन्न असून पावसाळ्यात येथे चालणारी अनोखी मासेमारी प्रसिद्ध आहे.

गोड्या पाण्यात अंडी (गाबोली) सोडण्यासाठी आतुर झालेला व अप्रतिम चवीने परिपूर्ण असणारे मासे येथील स्थानिक लोकांचे मुख्य अन्न आहे. चढणीचे (वल्गन) मासे अंडी सोडण्यासाठी उलट दिशेने प्रवास करतात व हेच मासे वेगवेगळ्या क्लुप्त्या करून पकडण्यासाठी सध्या येथील मासेमार व्यस्त झाला आहे.

तालुक्याला पिंजाळ, वैतरणा, तानसा, गारगाई व देहर्जे या नद्यांनी वेढले असून नद्यांना जोडणारे लहानमोठ्या ओहोळाचे जाळे या भागात विणलेले आहे. मान्सूनचे आगमन झाले की ओहोळ व नाले नद्यांना जोडले जातात ज्यामार्गे अंडी (गाबोली ) सोडण्याची उत्सुकता लागून राहिलेले मासे सैरभैर चढून शेतांकडे धाव घेत असतात.

मासे पकडण्यासाठी येथील लोकांनी केलेल्या क्लुप्त्या माशांना अलगद अडकवतात तर यानंतर श्रावण - भाद्रपद महिन्यात नदीकडे उतरणाऱ्या माशांना अशाच पद्धतीने कौशल्य वापरून पकडले जाते. चढणीची या दिवसांतील ही मासेमारी अनेकांसाठी उदारनिर्वाहाचे साधन देखील बनते.

वल्गनीचा मासा विशेष चपळ असून त्याला पकडण्यासाठी तितकेच कौशल्य व साधने लागतात. वाड्यातील लोकांकडे ती पुरेपूर उपलब्ध असून सर्वात महत्वाचे म्हणजे माशांच्या पूर्ण जीवनाचा अभ्यास येथील लोकांना असल्याने हा एकप्रकारचा व्यवसाय तेजीत सुरू असतो. कडवाली, पात्या, शिंगाला, मळ्या, डाकू, मुरी, लहान कोळंबी, कानोसा, वाडीस, वाव, निहा या स्थानिक भाषेतील माशांच्या जातींचा प्रामुख्याने यात समावेश असतो. तोंड्या, भोतड, मलई, पागेर, गळकाडी, भूसे, झोळी अशा पारंपरिक साधनांचा वापर करून मासेमारी केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT