Raigad News : पावसाच्या‍ आगमनाने वलगनीचे मासे पकडण्यासाठी नदी-नाल्यांवर झुंबड

गाबोळी असलेल्या माशांना खवय्यांकडून मोठी मागणी
Rural Fishing
पावसाच्या‍ आगमनाने वलगनीचे मासे पकडण्यासाठी नदी-नाल्यांवर झुंबडpudhari photo
Published on
Updated on

सुधागड : संतोष उतेकर

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे कोरडे पडलेले नदी, नाले, तलाव आणि धरणे पाण्याने भरत आहेत. पाऊस लांबल्याने चिंतेत असलेला बळीराजा सुखावला असतानाच, दुसरीकडे खवय्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. नदी-नाल्यांना नवीन पाणी आल्यामुळे ग्रामीण भागात 'वलगणीचे' (अंडी देण्यासाठी कमी पाण्यात येणारे) मासे पकडण्याची लगबग युध्दपातळीवर सुरू झाली आहे.

१ जूनपासून समुद्रातील मासेमारी कायदेशीररीत्या बंद झाल्यामुळे खवय्यांचे डोळे गोड्या पाण्यातील मासळीकडे लागले होते. मात्र, जूनचा पंधरवडा उलटला तरी पाऊस नसल्याने जलस्रोत आटले होते आणि माशांची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. आता पावसाच्या आगमनाने चित्र बदलले असून बाजारात आणि नदी-नाल्यांच्या काठावर शेतात गोड्या पाण्यातील माशांची मोठी मेजवानी सुरू झाली आहे.

Rural Fishing
Vashi Taluka Rain Update | वाशी तालुक्यावर वरुणराजा पुन्हा कोपला! 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार

सध्या चिवण्या, मळे, शिवडा, कटला, अरलय, वाम, कोलंबी, खवल आणि म्हूऱ्या यांसारखे मासे सापडत आहेत. स्थानिक लोक रात्री-अपरात्री आणि पहाटेच्या वेळी खूप मेहनतीने हे मासे पकडत आहेत. या माशांच्या विक्रीतून त्यांना चार पैसे मिळण्यास मदत होत आहे. आम्ही अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत होतो. पाऊस सुरू होताच नदीला नवीन पाणी आले आणि वलगणीचे मासे खाली उतरले आहेत. आम्ही जाळे आणि पाग घेऊन रात्रीचे मासे पकडत आहोत. सध्या मिळणाऱ्या बहुतांश माशांमध्ये गाबोळी असल्याने खवय्यांकडून मोठी मागणी आहे. असे मासेमार जितेश तांडेल यांनी सांगितले.

Rural Fishing
Fishing News : पोलादपुरात नदीकिनारी गळाने मासे पकडण्यास पसंती

काय असते 'वलगण' किंवा 'उधवण'?

पाऊस पडल्यानंतर नदी आणि खाडीतील पाणी वाढते. अशा वेळी मासे प्रजननासाठी (अंडी देण्यासाठी) नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहत शेतातील किंवा नदीकाठच्या कमी पाण्यात येतात. या प्रक्रियेला स्थानिक भाषेत 'वलगण' किंवा 'उधवण' म्हणतात. हे मासे चवीला अतिशय उत्कृष्ट असतात आणि त्यांच्या पोटात हमखास अंडी (गाबोळी किंवा पेर) सापडतात. हे वलगणीचे मासे पकडण्यासाठी सध्या गावागावांत अबालवृद्धांची झुंबड उडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news