Palghar alliance tension pudhari photo
पालघर

Palghar politics : ठाण्याचा इतिहास शोधताना, पालघरची युती होतेय धूसर

नाईक-शिंदे संघर्षामुळे पालघरात युतीतील फूट कायम राहणार

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, असे सांगतानाच कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा याशिवाय ज्याने जीवनात प्रकाश दाखवला शक्ती दिली अशा लोकांचा ज्यांना विसर पडतो त्याला कृतघ्नपणा म्हणतात असे वक्तव्य केले. यावेळी व्यासपीठावर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि विनायक राऊत यांना उद्देशून ‌‘माझी भाषा आपल्याला समजते का‌’ असा प्रश्न विचारला यामुळे ही सगळी टीका नाव न घेता शिंदे यांच्यावरच केली का? या चर्चांना उधाण आले आहे. या अशा अनेक वक्तव्यांमुळे नाईक-शिंदे संघर्षामुळे पालघरात युतीतील फुट कायम राहणार असल्याचे दिसते.

नाईक यांच्याकडून शिंदे यांना टोला लगावण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. याआधी देखील जिल्ह्यातील मनोर या ठिकाणी एका कार्यक्रमात ‌‘काही जणांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली‌’, असे वक्तव्य केले होते. तर जव्हार येथील जनता दरबारात माझ्या रेंजचा एकही नेता ठाणे जिल्ह्यात नसल्याचे सांगत शिंदे यांना डीवचल्याचे दिसून आले होते. यावर अद्यापपर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कसलेही वक्तव्य केलेले नसले तरी शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी मात्र नाईक यांच्या प्रत्येक टीकेवर उत्तर दिले की देखील दिसून आले. अगदी काल परवाच ठाण्याच्या इतिहासावर नाईक यांनी जे भाष्य केले त्यावरून युतीचा पालघर जिल्ह्यातील वर्तमान मात्र बिघडणार हे नक्की झाले आहे.

महायुतीकडून जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा लढण्यात आल्या यामध्ये जिल्ह्यातील सहा पैकी पाच विधानसभेत महायुतीला मोठे यश मिळाले. यामुळे महायुती असणे अतिशय आवश्यक असल्याचे चित्र दिसून येते. मात्र नुकत्याच झालेल्या महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत मात्र युती फीसकटली आणि स्वतंत्रपणे या निवडणुका लढण्यात आल्या. यामध्ये वसई विरारची महानगरपालिका सोडली तर डहाणू नगरपरिषद आणि पालघर नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा विजय झाला. तर जव्हार आणि वाडा या ठिकाणी भाजपाने विजय मिळवला डहाणू नगरपरिषदमध्ये तर भाजपाला हरवण्यासाठी शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत एक वेगळाच पॅटर्न राबवल्याचे जिल्ह्याने पाहिले.

या निवडणुकावेळी युतीतील मित्र पक्षांनी एकमेकांवर प्रचंड तोंडसुख घेताना दिसून आले. यामुळे जिल्ह्यात युतीत आधीच बेबनाव असताना आता भाजपाचे नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये होत असलेल्या शाब्दिक चकमकीमुळे भविष्यात तरी पालघर जिल्ह्यातील युतीत एक मत होईल का, याबाबत आता शंका उपस्थित होत आहे. कारण की नाईक यांनी शिंदे यांना टोला लावताना नुकताच ठाणे शिवसेनेचा खरा इतिहास मांडण्याचा आणि तो सांगितला जात नसल्याचा दावा केला.

यातूनच ठाण्याच्या शिवसेनेचा इतिहास काहीही असेल मात्र या युतीतील नेत्यांच्या एकमेकांवरील वक्तव्यामुळे पालघर जिल्ह्यातील युतीचा बिघडलेला वर्तमान ठीक होईल की नाही, याची शाश्वती सध्या तरी कोणालाच देता येणार नाही. याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावरून येथील जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असे चित्र असले तरी ही निवडणूक कधीही लागू शकते, या भावनेतून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात इच्छुक उमेदवार यांनी आपला प्रचार प्रसार विविध माध्यमातून सुरू केल्याचे देखील दिसून येत आहे. मागे याबाबत आरक्षण जाहीर झाल्यानंतर तर या प्रचाराला अधिक गती देखील मिळाली होती.

वरिष्ठ नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्याने सत्तासंघर्ष वाढणार

नगरपंचायती नगरपरिषदा या स्थानिक प्रश्नावर होतात याबाबत स्थानिक राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने होते. यामध्ये अनेकदा युती आघाडी यांचा जास्त परिणाम न होता स्थानिक पातळीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अशी राजकीय जुळवा जुळव होत असते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होत नाही. मात्र येत्या काही महिन्यात पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे.

जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा समजले जाते अशावेळी मात्र युती होताना मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कारण की मागील जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना-भाजप यांची युती होती. मात्र आता या युतीची शक्यता धूसर होताना दिसत आहे. कारण की जेव्हा कधी येथील युतीची घोषणा व्हायची असेल किंवा तशा राजकीय हालचाली करावयाच्या असतील तेव्हा वरिष्ठ नेत्यांचे एकमत होणे आवश्यक आहे. मात्र सध्या पालघर जिल्ह्यात तरी युतीत विस्तव देखील जात नसल्याचे चित्र आहे.मग ही अशी बोलणी कोण करील हा ही प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT