Zilla Parishad politics : झेडपीच्या सत्तेबाहेर ठेवल्याने शिवसेनेत नाराजी

स्थानिक नेत्यांच्या एकनाथ शिंदेंकडे तक्रारी; स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांत तणाव
Zilla Parishad politics
झेडपीच्या सत्तेबाहेर ठेवल्याने शिवसेनेत नाराजी pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : दिलीप सपाटे

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीत भाजपाने युतीधर्म बाजूला ठेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागोजागी सत्तेपासून दूर ठेवल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि साताऱ्यातील पदाधिकारी आणि नेत्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे याबद्दलची नाराजी प्रकट केली असून स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला आहे.

राज्यात डबल इंजिनचे ट्रिपल इंजिन करून प्रत्येक ठिकाणी महायुती कायम ठेवण्याच्या घोषणा शिवसेना-भाजपचे बडे नेते देत असताना स्थानिक पातळीवर मात्र शिवसेनेला वगळून सत्ता स्थापन करण्याचे उपद्व्याप स्थानिक भाजप नेते करत असल्याची भावना शिवसेनेच्या गोटात आहे. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची रणधुमाळी राज्यात सर्वत्र सुरू आहे. या सत्तासंघर्षात भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला एकटे पाडल्याचे चित्र आहे.

Zilla Parishad politics
‌Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर‌’साठी शिंदे सेनेच्या हालचाली?

छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐनवेळी शिवसेनेचे 4 उमेदवार फोडून भाजपने सत्ता स्थापन केली. त्याचे पडसाद आता राज्यात इतर ठिकाणीही उमटू लागले आहेत. परभणीमध्येही शिवसेना-भाजप युती करून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, नंतर शिवसेनेने उबाठा गट आणि राष्ट्रवादीशी आतून चर्चा सुरू केल्याने भाजपाने तेथे राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार राजेश विटेकर यांना सोबत घेत त्यांच्या भावाला उपाध्यक्षपद देत राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. त्यावर फसवणूक झाल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. परभणीत भाजपचा अध्यक्ष,राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष, तर शिवसेनेचा सभापती करू असे सांगण्यात आले होते. मात्र भाजपाने शब्द पाळला नाही, असे शिवसेनेला वाटतेे.

छत्रपती संभाजीनगर, परभणी याठिकाणी यापूर्वीच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली असून पक्षातील वरिष्ठदेखील भाजपकडून मिळत असलेल्या या वागणुकीमुळे नाराज झाले असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

थेट साताऱ्यातही धक्का

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यातही जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला बाजूला सारून सत्ता बनवण्याची रणनीती भाजपकडून आखली जात असल्याची चर्चा असल्याने शिवसेना गोटात अस्वस्थता वाढली आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपला 5 सदस्य कमी पडत असताना शिवसेनेचे काही जिल्हा परिषद सदस्य आपल्या गळाला लावून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची चर्चा आहे. युतीधर्माला जागूनच अध्यक्ष उपाध्यक्षपदासहित सर्व निवडणुका व्हाव्यात तसेच भाजपने स्थानिक नेतृत्वाच्या अपेक्षांना लगाम घालून युतीधर्म पाळावा अशी अपेक्षा आता शिवसेनेकडून उघडपणे व्यक्त केली जाऊ लागली आहे.

साताऱ्यात मकरंद पाटलांवर फिल्डिंग

परभणीमध्ये भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) आमदार राजेश विटेकर यांना सोबत घेऊन शिवसेनेला धक्का दिला. आता साताऱ्यातही शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्याची रणनीती आखली आहे. साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना धक्का देण्यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे दोघे एकत्र येऊन भाजपाला सत्तेबाहेर ठेवतील अशी चर्चा जिल्ह्यात होती . पण, भाजपाने मकरंद पाटील यांना सोबत घेऊन सातारा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

भाजपाला सत्ता स्थापनेसाठी पाच सदस्यांची गरज आहे. शिवसेनेचे दोन सदस्य भाजपाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच मकरंद पाटील भाजपासोबत आल्यास भाजपा आणि राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन होईल. परभणीप्रमाणे साताऱ्यातही राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होऊ शकतो. आपल्या जिल्ह्यात भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती आखल्याने एकनाथ शिंदे कमालीचे नाराज असल्याचे समजते.

Zilla Parishad politics
छत्रपती संभाजीनगर, परभणी जि.प. मध्ये भाजपचा अध्यक्ष

दिल्ली दौऱ्याचे कारण

दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला. उद्धव ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी हे ऑपरेशन टायगर असल्याची चर्चा पसरली. मात्र राज्यात सत्तेत असूनही भाजपकडून होणारी नाकेबंदी भाजप श्रेष्टींच्या कानी घालण्यासाठी शिंदे यांनी हा दौरा केला असावा असे मानले जात आहे. मात्र या नाकेबंदीतून शिंदे यांची सुटका होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news