Municipal elections | विकासाला कौल

Municipal elections
Municipal elections | विकासाला कौल(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात सुरू असलेल्या विकासपर्वाला, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस देत असलेल्या गती-शक्तीला मुंबईसह राज्यातील महानगरांनी सकारात्मक कौल दिला आहे. ‘अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा’ हे वाक्य उच्चारत ज्या महानगरात भाजपची स्थापना झाली होती, त्या मुंबईचा प्रथम महापौर भाजपचा होईल. हा पाडाव शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबाच्या सहाय्याने नव्हे तर भाजपने नगरसेवकांचे शतक करत स्वतःच्या ताकदीवर गाठला आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विकासाला देवेंद्र फडणवीस यांनी जोड दिली.

डबल इंजिनचे सरकार आपल्या शहरात, आपल्या गावात आणि आपल्या महानगरात अधिक शक्तीने धावावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचे निकालातून दिसते. आर्थिक राजधानी मुंबईत अस्मितांच्या भाषिक राजकारणाऐवजी विकासाचे भविष्यगामी सत्ताकारण अधिक पसंत असल्याचे मतदारांनी दाखवून दिले. 2019 साली भाजप आणि शिवसेनेचा एकत्रित विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नाकारले गेलेले मुख्यमंत्रिपद ही एक दुखरी नस. या अध्यायाची परतफेड करणारे अनेकविध ‘कार्यक्रम’ भाजपने हिशेब चुकता करायला प्रत्यक्षात आणले. त्याची समाप्ती मुंबई महापालिका निवडणूक असेल हे स्पष्ट होते. खरे तर महाराष्ट्र आणि मुंबईवर भाजपने कायम शिवसेनेच्या सहाय्याने राज्य केले. हा आधार नाहीसा झाल्यावर दोघांचे काय झाले? तर शिवसेनेला महापौरपद गमवावे लागले आणि भाजप महापौरपद मिळवेल असे दिसते.

महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या जवळपास प्रत्येक ठिकाणी भाजपचा विकास पसंत असल्याचा कौल जनतेने दिलेला आहे. हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान आहे, तसेच भाजपच्या संघटनात्मक बांधणीचे यश मानावे लागेल. विकासाचे राजकारण करत शहरांचे चित्र पालटून देणारी मेट्रो, उत्तम नगर योजना, सांडपाणी व्यवस्थापन, गरिबांना घरे, मध्यमवर्गीयांना उत्तम प्रवास अशा अनेक विविध योजना फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने कार्यान्वित केल्या. त्याची पावती या निकालांनी दिली, असे म्हणणे योग्य ठरेल. कोणताही निकाल हा नेत्याची राजकारणावरची पकड स्पष्ट करून दाखवतो, तसेच त्याला अनेकविध निर्णय घ्यायला प्रेरणा देत असतो. या निकालाने दिलेला जनतेचा हा कौल विनम—पणे स्वीकारून महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना गावोगावी पोहोचवण्याचे शिवधनुष्य देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांना उचलावे लागणार आहे.

हे कार्य ते कशाप्रकारे करतात यावर त्यांची भविष्यातील वाटचाल अवलंबून राहीलच. शिवाय जातीपातीच्या-धर्माच्या वादात अडकलेल्या राज्याला आता या छोट्या लढायांऐवजी विकासाची कास पत्करावी लागेल. मुंबईच्या विविध भागांमध्ये शिवसेना हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला ब—ँड आजही ताजा आणि स्वीकारार्ह असल्याचेही निकालांनी मराठीबहुल भागात दाखवून दिले. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा एकनाथ शिंदेंकडे नसून तो उद्धव आणि राज या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडेच असल्याचे मुंबईत निकाल दाखवतात. उद्धव ठाकरे यांनी दुरावलेले बंधू राज ठाकरे यांना समवेत घेऊन मराठी मतांची मोट बांधली. 20 जागांची घसरण झाली असली तरी आम्ही मराठी माणसाचा आवाज आहोत हे ठाकरे सांगू शकतील. आता त्यांनी मराठी माणसाला नवी स्वप्ने दाखवावीत ही अपेक्षा. प्रत्येक निकाल काहीतरी शिकवून जात असतो. तसा धडा तेथील राजकीय पक्ष घेऊ शकतात का हे त्यांनी ठरवायचे असते.

राज्याच्या अन्य भागांमध्येही भाजपला ज्या प्रकारे प्रतिसाद मिळाला ते लक्षात घेता महानगरीय मानसिकता ही मोदी-फडणवीस यांच्या मागे उभी असल्याचेही या कौलाने दाखवून दिले. कोणताही निकाल हा जबाबदार्‍या घेऊन येत असतो. राज्यात अत्यंत वेगाने वाढलेली शहरे मोठ्या प्रमाणात बकाल आहेत. वाहतूक समस्या, सांडपाणी व्यवस्थापन, गृहनिर्माण, कार्यालयांमध्ये जाताना नागरिकांना सोसावे लागणारे त्रास हे सगळे मुद्दे सुटले तर विकासाच्या यात्रेत नागरिक स्वतःचे योगदान देऊ शकतील. या शहरांचे संचित आणि ओळख लक्षात घेऊन ती ठळकपणे समोर आणावी लागेल. फडणवीस हे सर्व प्रश्न लक्षात घेऊन त्यावर प्रचारात भर देत असल्याचे दिसले, जनतेने त्यांना त्याचमुळे कौल दिलेला दिसतो. ती जबाबदारी पूर्ण करण्याचे आव्हान अर्थातच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सत्तेत एकत्र असलेल्या तिन्ही पक्षांनी जेथे शक्य आहे आणि ताकद आजमावायची आहे, तेथे परस्परांविरुद्ध उभे राहण्याचा प्रयत्न केला. आपापसातच जागा वाटून घ्यायच्या, हा त्या प्रयत्नांचा उद्देश होता. त्यातही भाजप सरस ठरला. भाजपबरोबर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी जेथे जेथे स्वबळावर निवडणूक लढवली, तेथे तेथे जनतेने भाजपला कौल दिला.

अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे स्वाभिमानयज्ञ सुरू केला होता. त्या स्वाभिमान यात्रेला जनतेची पसंती नाही हे निकालांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात निदान नागरी भागात तरी शरद पवार ही शक्ती नाही. पवार कुटुंबाला फारसे स्थान नाही, हे देखील स्पष्ट झाले. पवार काका-पुतण्याला त्यांच्याच मैदानात मोठा पराभव पत्करावा लागला. विशेषत: पुण्यात झालेला नामुष्कीजनक पराभव पवारांच्या राजकारणाची भरकटलेली दिशा स्पष्ट करतो. राज्यातील अल्पसंख्याक जनता आधारासाठी काही पक्ष शोधते आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. मुस्लिम अस्मितेची जहाल भाषा बोलणार्‍या एमआयएम या पक्षाला या निवडणुकीत मिळालेले यश लक्षवेधी आहे. कोणत्याही राज्याचा विकास हा अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या खेळावर होत नसतो तर तो समन्वयाचा एक प्रतीकात्मक भाग असतो. तो लक्षात घेऊन त्यासाठी आखणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचे असेल तर 52 टक्के जनतेला विश्वासात घेऊन त्यांना पुढे नेणारे काम करावे लागेल. त्यासाठी नव्या कारभार्‍यांना शुभेच्छा. स्थानिक स्वराज्य संस्था भ—ष्टाचाराचे कुरण झाल्या आहेत. त्यामुळे यशाचा उन्माद न बाळगता कामाला लागण्याचे भान नव्या कारभार्‍यांनी ठेवावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news