मनवेलपाडा: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ठाणे-घोडबंदर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशीही भीषण वाहतूक कोंडी झाल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
कर्प कंपाऊंड परिसरात सुरू असलेल्या खड्डे दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला असून सकाळपासून रात्रीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा मोठा फटका बसला.
मिरा-भाईंदर महापालिकेकडून रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जात असली, तरी त्यासाठी पुरेसे वाहतूक नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि काही किलोमीटरपर्यंत वाहने संथ गतीने सरकत राहिली.
या कोंडीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या तसेच गुजरातच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अनेक तास रस्त्यावर अडकून पडावे लागले. सार्वजनिक वाहतूक सेवेलाही याचा मोठा फटका बसला.
बससेवा उशिराने धावल्याने प्रवाशांची गैरसोय झाली, तर अनेकांना वेळेवर कार्यालय, शाळा आणि महाविद्यालय गाठणे शक्य झाले नाही. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वाहनांची प्रचंड संख्या आणि सुरू असलेली दुरुस्ती यामुळे वाहतूक सुरळीत करण्यास मोठ्या अडचणी आल्या. काही ठिकाणी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र त्यावरही वाहनांची गर्दी वाढल्याने फारसा दिलासा मिळाला नाही.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पावसाळ्यात खड्डे बुजविण्याची कामे आवश्यक असली, तरी ती कमी गर्दीच्या वेळेत किंवा टप्प्याटप्प्याने करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे दररोज हजारो प्रवाशांचा वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडीमुळे परिसरातील प्रदूषणातही वाढ झाली आहे. अनेक वाहने तासन्तास एकाच ठिकाणी उभी राहिल्याने इंधनाचा अपव्यय झाला, तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्णांना याचा अधिक फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नागरिकांनी प्रशासनाकडे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची, दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करण्याची आणि भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान महामार्गावरील कामे पूर्ण होईपर्यंत या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि अतिरिक्त वेळ गृहीत धरूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.