पालघर : हनिफ शेख
पालघर जिल्ह्यातील बाहाडोली काळया जांभळांना भौगोलिक मानांकन प्राप्त असल्याने प्रसिद्ध आहे. तर जिल्ह्यात प्रथमच थायलंड व्हाईट जांभळाची व्यापारी तत्वावर शेती उच्च शिक्षित आदिवासी युवकाने यशस्वी केली आहे. हा प्रयोगशील शेतकरी डहाणू तालुक्यातील असून त्याने मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे ही बागायती फुलवली आहे. मोखाडा आणि विक्रमगड तहसीलदार तसेच राज्यातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे प्रमुख शास्त्र डॉ. विलास जाधव यांनी भेट देऊन या प्रयोगशिलतेची दखल घेत कौतुक केले.
अहिल्यानगर(अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील नर्सरीतून डॉ. सुमित ढाक यांनी थायलंड व्हाईट जांभळाची 100 रोपे जून 2023 साली आणून मोखाड्यातील पळसपाडा येथील शेतीवर 12 फट लांब आणि 10 फूट रुंद अशी लागवड केली. शेणखत तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून पाणी व विद्राव्य खतांचे व्यवस्थापन केले.
या सर्वांसह मजुरीवर वर्षाकाठी 30 हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याने आंतरपीक म्हणून पहिल्या वर्षी खरबूज लागवडीतून 22 हजार तर दुसऱ्या वर्षी कलिंगड लागवडीतून 50 हजारांचा नफा मिळवला. त्याद्वारे जांभूळ शेतीसाठी आलेला खर्च भरून निघाल्याचे डॉ. ढाक सांगतात.
3 वर्षानंतर या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर येऊन पांढरी जांभळे गुच्छाने लगडली आहेत. प्रती झाड 5 ते 6 किलो उत्पादन अपेक्षित असून 150 ते 160 रुपये प्रतिकिलो फळांना बाजारभाव आहे. उत्पादन खर्च वजा जाता पहिल्याच वर्षी 50 हजारांचा नफा त्यांना अपेक्षित आहे. सोशल मीडियावर या लागवडीची माहिती त्यांनी द्यायला सुरुवात केल्यावर अनेकांनी हे फळ माहिती नसल्याचे सांगत बागायतीला भेट दिली.
या जांभळाच्या झाडांची उंची कमी असते, 3 वर्षांपासूनच फळधारणा सुरू होते. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने पालघरसह नाशिक व कोकणातील उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे असे डॉ. ढाक सांगतात. रोपांची उपलब्धता, लागवड तंत्रज्ञान इ. मार्गदर्शन करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
काळया जांभळां प्रमाणेच पांढरी जांभळही आयुर्वेदिक गुणधर्मयुक्त आणून मधुमेह, किडनी विकार रुग्णांसाठी लाभदायक आहेत. हे फळ दुर्मिळ व चविष्ट असल्याने बाजारात मागणी असते. मोखाडा तहसीलदार रोहन शिंदे व विक्रमगड तहसीलदार मयुर चव्हाण यांनाही या फळांचा गोडवा आवडल्याने त्यांनी प्रयोगशील शेतीचे कौतुक केले.
मोखाडा तालुक्यातील स्थलांतर, कुपोषण तर दुसरीकडे येथील लोकांची आर्थिक परिस्थिती पाहता या भागातील स्थलांतर रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बारमाही पीक देणारी शेती याशिवाय नगदी पिके आणि फळबागांचं उत्पन्न घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर ढाक सांगतात. यामुळे या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याचा देखील त्यांचा मानस आहे.
याशिवाय सध्या त्यांच्या या शेतीमध्ये पिकणारा कलिंगड देखील त्यांनी कोणत्याही व्यापाऱ्यांना न देता स्थानिक पातळीवर गावोगावी जाऊन फेरी करणाऱ्या व्यावसायिकांना अगदी कमी भावात दिला आहे .शेतीतून फक्त उत्पन्न मिळवणे नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याचा देखील त्यांच्या या हेतूचे तालुक्यातून स्वागत होत आहे.
काजू प्रक्रिया केंद्र सुरू करणार
मोखाडा तालुक्यातील पोशारा ग्रामपचायत मधील पळसपाडा गावानजी 20 एकर शेतीमध्ये डॉ.ढाक यांनी शेतीविषयक अभिनव प्रयोग करीत आहेत यामध्ये सफेद जांभळा बरोबरच दोन ते तीन जातीतील कलिंगडे पपई आणि सुंदर अशी फुलांची रोपे देखील तयार केली आहेत. यानंतर या भागात चांगल्यापैकी उत्पन्न देणारा काजू याला हाताची बाजारपेठ मिळावी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि महत्त्वाची म्हणजे स्थानिक पातळीवरच त्याची विक्री त्यांना करता यावी यासाठी याच ठिकाणी लवकरच काजू प्रक्रिया केंद्र देखील सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि यासाठी ची तयारी देखील सुरू असल्याचे त्या ठिकाणी दिसून येते यामुळे तालुक्यातील काजू करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.
पुरस्काराने सन्मानित
डॉ. ढाक यांनी 2011 साली कृषीची एमटेक पदवी घेतली, 2015 साली मृद व जलसंधारण अभियांत्रिकीत पीएचडी केली. जर्मनीच्या लंबर्ट अकॅडमी पब्लिकेशन्सने त्यांचा प्रबंध प्रकाशित केला. आदिवासी समाजातून देशातील सर्वात कमी वयात पिएचडी प्राप्त केल्याने राज्य सरकारने 2019 साली आदिवासी रत्न पुरस्काराने सन्मानित केले. आपल्या ज्ञानाचा उपयोग पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्हावा हे त्यांचे धेय्य आहे.