Tarapur Factory Blast Pudhari
पालघर

Tarapur Factory Blast: विराज प्रोफाइल कंपनीत भट्टीचा भीषण स्फोट

तीन कामगार जखमी, लोखंडी पत्रे उडाले, सुरक्षारक्षक कक्षाच्या काचा फुटल्या

पुढारी वृत्तसेवा

बोईसर: पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील नामांकित विराज प्रोफाइल कंपनीत सोमवारी सकाळी भट्टीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सलग तीन भीषण स्फोट झाल्याची घटना घडली.

या दुर्घटनेत तीन कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे कारखान्यातील लोखंडी पत्रे उडून लांब जाऊन पडली, तर सुरक्षारक्षकांच्या कक्षाच्या काचा फुटल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली.

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एसएमएस-१ विभागात असलेल्या विराज प्रोफाइल कंपनीत धातूचा भंगार माल वितळवून उत्पादन करण्याचे काम सुरू होते. उत्पादन प्रक्रिया सुरू असतानाच भट्टीच्या टँकमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यानंतर एकापाठोपाठ तीन जोरदार स्फोट झाले. स्फोटांचा आवाज आणि हादरे इतके तीव्र होते की, संपूर्ण औद्योगिक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरातील लोखंडी पत्रे दूरवर जाऊन पडली. तसेच सुरक्षारक्षकांच्या कक्षाच्या काचा फुटल्या. दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल तसेच औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

स्फोट नेमका कोणत्या तांत्रिक कारणामुळे झाला, भट्टीची सुरक्षा व्यवस्था कार्यरत होती का आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, तारापूर औद्योगिक वसाहतीत वारंवार घडणाऱ्या औद्योगिक दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कारखान्यांमध्ये सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन केले जाते का, याची नियमित तपासणी केली जाते का, असा सवाल कामगार आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने या घटनेची सखोल चौकशी करून भट्टीच्या सुरक्षेपासून ते कंपनीतील संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करावे.

सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सध्या पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडून दुर्घटनेचा तपास सुरू असून, स्फोटामागील नेमके कारण आणि सुरक्षेतील त्रुटी चौकशीनंतर स्पष्ट होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT