Tarapur MIDC Water Pollution pudhari photo
पालघर

Tarapur MIDC Water Pollution : तारापूर एमआयडीसीत हिरव्या रासायनिक पाण्याचे संकट

एका प्लॉट समोरील नाले प्रदूषित!, गडद हिरव्या रंगाचे संशयास्पद सांडपाणी

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील जलप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक N-17 समोरील खुल्या नाल्यात गडद हिरव्या रंगाचे संशयास्पद पाणी साचल्याचे निदर्शनास आले आहे. नाल्यातील पाण्याचा बदललेला रंग आणि त्यामध्ये तरंगणारा कचरा पाहता औद्योगिक सांडपाण्याच्या व्यवस्थाप-नाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी सिमेंटच्या खुल्या गटारातून वाहणाऱ्या पाण्याचा रंग अत्यंत गडद हिरवा झाला आहे. गटारात प्लास्टिकसह इतर टाकाऊ साहित्यही तरंगताना दिसत आहे. हे पाणी एखाद्या औद्योगिक प्रक्रियेतून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या पाण्याचे नमुने तपासण्यात आले नसल्याने त्यातील रासायनिक घटक आणि प्रदूषणाची तीव्रता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात शेकडो रासायनिक कारखाने कार्यरत असताना सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. असे असतानाही खुल्या गटारांमध्ये संशयास्पद रंगाचे पाणी आढळून येत असल्याने सांडपाणी व्यवस्थापनाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा पाण्यामुळे माती, भूजल आणि परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकाराची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गांभीर्याने दखल घेऊन N-17 परिसरातील खुल्या गटारातील पाण्याचे तातडीने नमुने घ्यावेत. त्यामधील रासायनिक घटकांची प्रयोगशाळेत तपासणी करावी. तसेच परिसरातील संबंधित कारखान्यांच्या सांडपाणी प्रक्रिया यंत्रणांची तपासणी करून हे पाणी नेमके कोणत्या स्रोतामधून गटारात येत आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

औद्योगिक प्रदूषणाच्या प्रश्नावर वारंवार चर्चा आणि कारवाईचे दावे होत असताना प्रत्यक्षात खुल्या गटारांमध्ये असे संशयास्पद पाणी आढळणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे केवळ पाहणी करून औपचा-रिकता न करता दोषी आस्थापनेची निश्चिती करून नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. औद्योगिक विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी किती काळ सहन करायची, असा सवाल या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT