

डहाणू : धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंती निमित्त वाढवण बंदर, ग्रीनफिल्ड महामार्गासह पालघर जिल्ह्यातील विविध विनाशकारी प्रकल्पांविरोधात भूमिपुत्रांनी आंदोलन तीव्र केले आहे. आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी, मच्छीमार, शेतकरी आणि कष्टकरी संघटनांसह महाविकास आघाडीने वरोर येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्रकल्पांचे काम बंद पाडण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी सागरी मार्ग रोखून धरल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
वाढवण बंदर आणि ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम तातडीने थांबवण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी वरोर येथे सुरू असलेले काम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अडवल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर सुमारे तासभर चर्चा झाल्यावर वरोर बसस्थानक येथे आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली. आंदोलकांनी तेथेच ठिय्या देत रात्रीचा मुक्काम केला.
वरोर जवळ रास्ता रोको करण्यात आल्याने डहाणू-चिंचणी बोईसर-पालघर सागरी मार्गावरील वाहतूक सुमारे १२ तास ठप्प झाली होती. आमदार निकोले यांनीही कोस्टल मार्गावर ठिय्या देत आंदोलकांसोबत रात्र काढली.
ठप्प वाहतूक झाल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. जिल्ह्यात वाढलेल्या थंडीमुळे आंदोलकांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून आंदोलन सुरू ठेवले. या आंदोलनात महाविकास आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, जनवादी महिला संघटना, सिटू, कष्टकरी संघटना, आदिवासी हक्क संरक्षण महासंघ, पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत.
वाढवण बंदर आणि अन्य प्रकल्पांमुळे शेती-जमिनींचे नुकसान, विस्थापन, पारंपरिक रोजगारावर संकट आणि पर्यावरणाची हानी होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्प लादले जात असल्याचा आरोप करत भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणणारे प्रकल्प स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
आंदोलनाची तीव्रता वाढणार
लोकशाही मागनि आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून दबाव आणणे, खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची भीती दाखवणे आणि जनतेचा आवाज दडपण्याच्या प्रयत्नांचा आंदोलकांनी निषेध केला. बिरसा मुंडा यांच्या अन्याया विरोधातील लढ्याची प्रेरणा घेत जल, जंगल, जमीन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आंदोलनात विविध संघटनांचा वाढता सहभाग पाहता आगामी काळात आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
२० तासांच्या रास्ता रोको नंतर कोस्टल मार्ग वाहतुकीसाठी खुला
वाढवण बंदरा विरोधात सुरू असलेला कोस्टल मार्गावरील रास्ता रोको आंदोलन अखेर २० तासांनंतर सोमवारी मागे घेण्यात आले. आंदोलकांनी रास्ता रोको उठवत डहाणू-चिंचणी कोस्टल मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. त्यानंतर पोलिसांनी वाढवण येथे लावलेले बॅरिकेट्सही हटवले. मात्र, रास्ता रोको मागे घेतला असला तरी बंदरविरोधी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करत आंदोलकांनी रस्त्याच्या बाजूला ठिय्या कायम ठेवला आहे.