बोईसर : देशातील पहिली अनुशक्ती केंद्र असलेले तारापूर क्षेत्र तसेच देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारापूर एमआयडीसीकडे राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्यासाठी बोईसर येथून मंत्रालयापर्यंत पायी आंदोलन करून निवेदन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच बोईसर पोलिसांनी पहाटे त्यांच्या राहत्या घरातून अमोल गर्जे यांना ताब्यात घेत आंदोलन रोखल्याने परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सत्तरच्या दशकात उभारण्यात आलेल्या तारापूर एमआयडीसीमुळे आज परिसरातील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या अनेक गावांतील नागरिकांना स्थलांतर करावे लागत असल्याचे वास्तव आहे. केमिकल कारखान्यांमधून होणाऱ्या वायू व जलप्रदूषणामुळे संपूर्ण परिसराची अवस्था दयनीय झाली आहे. सुमारे 1 हजार 500 कारखाने असलेल्या या एमआयडीसीमध्ये पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी सातत्याने करत आहेत. हरित पट्टे आणि ग्रीन झोन सर्रास विक्रीस काढले जात असून पर्यावरणाचे खुलेआम धिंडवडे काढले जात असल्याचे चित्र आहे.
यापूर्वी हरित लवादात दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे तारापूर एमआयडीसीवर तब्बल 360 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. असे असतानाही मागील अडीच वर्षांच्या कालावधीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तारापूर एमआयडीसीला भेट देणे आवश्यक समजले नाही, असा थेट आरोप या प्रकरणी अमोल गर्जे यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचा आधार घेत बोईसर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अंतर्गत नोटीस बजावत अमोल गर्जे यांचे पायी आंदोलन बेकायदेशीर असल्याचे ठरवले. दरम्यान जिल्ह्यातील आंदोलनांच्या पार्श्वभुमीवर तसेच बोईसर- चिल्हार मुख्य रस्ता व अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण पुढे करत आंदोलनास मज्जाव करण्यात आला होता.
सागरी किनारपट्टीसह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर नागरिकांनी आंदोलनाची पावले उचलली आहेत. मुंबई- अहमदाबाद महामार्गाने आमदार निकोले यांच्या समवेत विविध संघटनांचे शेकडो कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत असल्याने संपूर्ण पालघर जिल्हा आंदोलनांच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे आजचा दिवस पालघर जिल्ह्यासाठी ‘आंदोलन वार’ ठरल्याचे चित्र आहे. मात्र, प्रशासनाच्या दडपशाहीमुळे ही आंदोलने यशस्वी ठरणार की पुन्हा दडपली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेर्.ें
बोईसर ते मुंबई मंत्रालय पायी आंदोलन करणार होतो. मात्र, आंदोलन सुरू होण्याआधीच बोईसर पोलिसांनी मला घरातून ताब्यात घेतले. जिल्ह्यात हुकूमशाही सुरू असून वरिष्ठांच्या आदेशावरून लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने दडपली जात आहेत.अमोल गर्जे, सामाजिक कार्यकर्ते, बोईसर.