Tarapur MIDC Fire Accident Pudhari
पालघर

Tarapur MIDC Fire Accident: तारापूर MIDC मध्ये भीषण आग; LDO इंधनामुळे काही क्षणांत विकराळ रूप

अग्निशमन दलाच्या 10-12 गाड्यांची धाव; सुदैवाने जीवितहानी टळली, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

बोईसर: संदीप जाधव

तारापूर औद्योगिक वसाहतीतील सेक्टर J-62 मधील एका कंपनीत मंगळवारी (दि. ) दुपारी LDO (लाईट डिझेल ऑइल) इंधनामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्वलनशील इंधनामुळे आगीने काही क्षणांतच विकराळ रूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता मोठी असल्याने विविध ठिकाणांहून अतिरिक्त पथकेही पाचारण करण्यात आली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिसर तात्काळ सील केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात प्रवेश बंद करण्यात आला असून नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार संबंधित कंपनीत सुमारे दहा कामगार काम करत होते. मात्र प्रसंगावधान राखत सर्व कामगारांनी वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी LDO इंधन साठ्यातून आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधित यंत्रणांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.

आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळेपर्यंत बचावकार्य सुरूच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT