

पेठवडगाव : आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडर पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम जाणवू लागल्याने पेठवडगाव शहरातील चहा-भजी विक्रेत्यांनी पर्याय म्हणून पुन्हा पारंपरिक लाकडी चुलींचा आधार घेतला आहे. गॅस उपलब्धतेत अडचणी येत असल्याने काही हातगाडी व्यावसायिकांनी गाड्यांवरच चुली पेटवून भजी तळणे आणि चहा बनविणे सुरू केले आहे. त्यामुळे शहरात ‘चुलीवरच्या चवीचे’ जणू पुनरागमन झाल्याची चर्चा सुरू आहे.
अमेरिका–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम छोट्या-मोठ्या हॉटेल व्यवसायासह हातगाडीवर चहा व नाश्ता विकणाऱ्या व्यावसायिकांवरही दिसू लागला आहे. पेठवडगाव येथील पालिका चौक परिसरातील काही विक्रेत्यांनी गॅसच्या अभावी गाड्यांवरच लाकडी चुली पेटवून ग्राहकांना गरमागरम भजी आणि चहा देण्यास सुरुवात केली आहे.
चुलीवर कढईत तळलेल्या भजी आणि पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या चहाची चव वेगळीच असल्याने ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गॅस कंपन्यांकडून टंचाई नेमकी कधी दूर होईल याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने सध्या चुलीच्या सहाय्यानेच व्यवसाय सुरू ठेवावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील घरगुती गॅस ग्राहकांना मात्र सिलिंडरचा पुरवठा नियमित सुरू असल्याचे दिसून येत आहे. गॅस एजन्सीकडून घरपोच सेवा सुरळीत सुरू असून एजन्सीसमोर विशेष गर्दी नसल्याचेही चित्र आहे.
ग्राहकांनी मागील सिलिंडर घेतल्यानंतर सुमारे २५ दिवसांनी बुकिंग केल्यास दोन दिवसांच्या आत घरपोच सिलिंडर उपलब्ध करून दिला जात आहे. घरगुती ग्राहकांना वेळेवर गॅस मिळावा यासाठी एजन्सी पातळीवर नियोजन केले जात असून ग्राहकांनी संयम ठेवून नियमानुसार बुकिंग केल्यास टंचाई जाणवणार नाही.
- सचिन चव्हाण, गॅस वितरक