बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक दुर्घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसताना आता धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या अवजड टँकरमधून थेट रस्त्यावर रासायनिक द्रव्याची गळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित टँकरच्या मागील बाजूस रसायनाची ओळख आणि त्यापासून उद्भवणाऱ्या धोक्याची माहिती देणारे महत्त्वाचे फलक फाटलेल्या व अस्पष्ट अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक सुरक्षेबरोबरच रासायनिक वाहतुकीच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तारापूर एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यावरून एक अवजड केमिकल टँकर जात असताना त्याच्या मागील भागातून रासायनिक द्रव्य रस्त्यावर सांडत असल्याचे निदर्शनास आले. सुमारे ४२ हजार किलो क्षमता असलेला हा टँकर धोकादायक रसायनांच्या वाहतुकीसाठी वापरला जात असल्याचे त्यावरील चिन्हांवरून स्पष्ट होते. मात्र, टँकरवर रसायनाची ओळख दर्शविणारे हॅझकेम आणि यूएन क्रमांकाचे फलक फाटलेले अथवा अस्पष्ट असल्याने नेमके कोणते रसायन वाहून नेले जात आहे, याची माहिती मिळणे कठीण झाले आहे.
रासायनिक टँकरमधून प्रवासादरम्यान गळती होणे ही केवळ वाहतूक नियमांची बाब नसून सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित गंभीर समस्या आहे. रस्त्यावर सांडलेल्या रसायनामुळे दुचाकीस्वारांचे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संबंधित रसायन विषारी, ज्वलनशील किंवा संक्षारक स्वरूपाचे असल्यास त्याच्या संपर्कामुळे नागरिक, कामगार आणि इतर वाहनचालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी टँकरचा अपघात झाल्यास त्यातील रसायनाची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेली माहितीच अस्पष्ट असेल, तर बचावकार्य करणाऱ्या यंत्रणांसमोरही मोठे आव्हान उभे राहू शकते.
या प्रकाराची प्रादेशिक परिवहन विभाग, बोईसर पोलीस, एमआयडीसी प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्तपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. संबंधित टँकरची तपासणी करून रसायनाची ओळख, गळतीचे कारण आणि वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्यांची पडताळणी करावी. दोष आढळल्यास संबंधित वाहनचालक, मालक आणि जबाबदार कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
त्यानंतर आरती ड्रग्स लिमिटेडच्या प्लॉट टी-१५० येथील युनिटमध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाच्या वायूगळतीची घटना घडली होती. या प्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २ मार्च २०२६ रोजी भेरजिया इंडस्ट्रीजच्या प्लॉट डी-१७ येथे ओलियम गळतीमुळे परिसरात पांढऱ्या धुराचे दाट लोट पसरले होते. या घटनेनंतर जवळपास २६०० नागरिक, कामगार आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते. या प्रकरणीही बोईसर पोलीस ठाण्यात कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बोईसर पोलीस ठाण्यातील पूर्वीच्या दुर्घटनांची नोंद
तारापूर एमआयडीसीत यापूर्वी घडलेल्या रासायनिक दुर्घटनांची पार्श्वभूमी पाहता या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी मेडली फार्मास्युटिकल्स कंपनीत नायट्रोजन वायूगळती होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. कंपनी व्यवस्थापनातील जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणांची धावपळ?
एकीकडे औद्योगिक क्षेत्रात विषारी वायूगळती, रासायनिक स्फोट आणि कामगारांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे रस्त्यावरून होणाऱ्या रासायनिक वाहतुकीची सुरक्षितता कितपत तपासली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखान्यांच्या आवारात रसायनांची हाताळणी करताना सुरक्षिततेचे नियम पाळले जातात का, टँकरची नियमित तांत्रिक तपासणी होते का, गळती रोखण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत आहेत का आणि वाहतुकीदरम्यान आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी चालकांकडे आवश्यक प्रशिक्षण व सुरक्षा साधने आहेत का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.