

Jugul Khidrapur Krishna River Bridge
कुरुंदवाड : कृष्णा नदीवरील जुगुळ-खिद्रापूर पुलाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडल्याने खिद्रापूर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. पुलाच्या अपूर्ण कामाला गती देण्यासाठी २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास २३ नोव्हेंबरपासून गाव बंद, ठिय्या आंदोलन आणि जलसमाधी आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कर्नाटक सरकारच्या माध्यमातून कृष्णा नदीवर जुगुळ-खिद्रापूरदरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. कर्नाटक हद्दीतील पुलाचे काम पूर्ण झाले असले, तरी खिद्रापूरच्या हद्दीतील काम भूसंपादनाच्या अडचणीमुळे अद्याप अपूर्ण आहे. परिणामी, गेल्या सहा वर्षांपासून पुलाचा प्रश्न प्रलंबित असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वीही विविध शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा केला. आंदोलने आणि निवेदनांनंतर जून २०२६ अखेर काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिलेली मुदत संपूनही काम पूर्ण झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.
भूसंपादनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा
अंतिम टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक महिन्यांपासून रखडली आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला अडथळा निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने भूसंपादन पूर्ण करून उर्वरित काम सुरू करावे, अशी मागणी सरपंच सारिका कदम यांनी केली. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.