तलासरीत ओसाड माळरानावर फुलवली ‌‘आंब्याची बाग‌’  pudhari photo
पालघर

Mango cultivation : तलासरीत ओसाड माळरानावर फुलवली ‌‘आंब्याची बाग‌’

ईश्वर वळवींची जिद्द ठरली प्रेरणादायी, चार एकरांत आंबा, लिंबू लागवडीचा आदर्श प्रयोग

पुढारी वृत्तसेवा

तलासरी : कोविड काळात अनेकांचे रोजगार ठप्प झाले असताना, तलासरी तालुक्यातील कोचाई गावातील सुशिक्षित तरुण ईश्वर वळवी यांनी शेतीतून यशाचा नवा मार्ग शोधला. बी.एडपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या ईश्वर यांनी चार एकर ओसाड माळरानावर विविध जातींच्या आंब्यांची लागवड करत स्वयंरोजगाराचे प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. ठिबक सिंचनाच्या मदतीने 1 हजार 51 आंबा कलमे तर 400 सरबती लिंबूची बहरलेली बाग आज त्यांच्या मेहनतीची साक्ष देत आहे.

हे गाव केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर आहे. शेतीचा आधार घेत स्वयंरोजगारातून आर्थिक प्रगती कशी साधायची प्रेरणादायी उदाहरण दिले आहे. ग्रॅज्युएशन, बी. एड पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण करून सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ओसाड माळरान मुडबार दगड जमिनीवर आंब्याचे विविध जाती लावून झाडे वाढवून स्वयंरोजगार निर्माण केला आहे.

दोन दिवसांपूर्वी काढलेला आंबा त्यामध्ये सर्वात मोठा कोकोनट जातीचा एक आंबा एक किलो 300 ग्रॅम वजनाचा आला होता. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू होती.संपूर्ण आंबा बाग ऑर्गनिक आणि इजराइल पद्धतीने चार एकरात लागवड केली आहे. यामध्ये 900 केसरची झाडे, 50 देवगड हापूस, 50 मलिका, 10 राजापुरी, 10 तोतापुरी, 5 दसेरी, 2 सुवर्णरेखा, 5 लंगडा, 2 एटीएम, 2 कोकोनट मँगो, 5 पायरी, 2 मिया झाकी, 2 दूध पेढा अशी एकूण 1051 झाडे लागवड केली आहे.

विशेष म्हणजे फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध देवगड हापूस तलासरीमध्येही लागवड होऊ शकतो अशी किमया या तरुणाने करून दाखवली आहे. लागवडी पासून हे चौथे वर्ष आहे. तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न सुरू झाले असून तिसऱ्या वर्षे 46 हजाराचे उत्पन्न मिळाले. यावर्षी एक लाखाच्या वर उत्पन्न अपेक्षित आहे. तर पुढच्या वर्षी दोन पट्टीने वाढ करण्याचे नियोजन आहे. यावर्षी पहिली आंबा तोडणी करून वाशी मार्केटला विक्री केल्याचे त्याने सांगितले.

उद्योगातून रोजगार निर्मिती करण्याचे स्वप्न

पालघर जिल्ह्यातील बेरोजगार, कामगार वर्ग पोटाची खळगी भागविण्यासाठी नोकरीच्या शोधात मुंबई, गुजरातमध्ये स्थलांतर करत असतो, या आदिवासी कामगारांना आपल्याच जिल्ह्यात रोजगार देण्याचा मानस या तरुणाने व्यक्त केला आहे. आंबा उत्पादनामध्ये बाय प्रॉडक्ट म्हणजे आंबा प्रक्रिया उद्योगात मुख्य पदार्थ (उदा.रस किंवा पल्प) तयार केल्यानंतर उरलेले घटक, ज्यांचा पुनर्वापर करून नवीन उपयुक्त वस्तू बनवता येतात.

साधारणपणे आंब्याच्या एकूण वजनापैकी 35% ते 60% भाग हा उप-उत्पादने किंवा कचरा म्हणून उरतो. यासाठी पालघर जिल्ह्यात शासनाने आंबा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या तरुणाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT