

कराड : कराड तालुक्यातील चोरे गावालगत वसलेलं पुनर्वसित सावरघर आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. एकेकाळी पाण्याचा थेंब नसलेलं, कुसळ उगवणारं ओसाड माळरान आणि आज त्याच ठिकाणी तब्बल सात हजाराहून अधिक झाडांनी नटलेलं हिरवंगार नंदनवन! ही किमया घडवून आणली ती केवळ 52 कुटुंबं आणि सुमारे 300 लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावाने. ‘गाव कसं असावं आणि ते कसं वसवावं’ याचा आदर्श नमुना जर कुणाला प्रत्यक्ष पाहायचं असेल, तर सावरघरला भेट देणं आवश्यक ठरतं.
गावात प्रवेश करताच नियोजनबद्ध रचना, स्वच्छ आणि सुबक अंतर्गत रस्ते, नीटनेटकी गटार व्यवस्था आणि हिरवाईने नटलेला परिसर लक्ष वेधून घेतो. प्रत्येक गोष्टीत शिस्त आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो.
पाटण तालुक्यातील मुरुड येथे तारळी नदीवर धरण उभारण्यात आल्यानंतर अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकीच ‘सावरघर’ हे गाव कराड तालुक्यात वसवण्यात आले. शासनाकडून मिळालेल्या ओसाड जमिनीवर ग्रामस्थांनी नव्याने 2002 मध्ये संसार मांडला. सुरुवातीला परिसर पूर्णपणे उजाड होता. ना पाणी, ना सावली, ना हिरवळ. पण ग्रामस्थांनी हार न मानता एकत्र येऊन पर्यावरणपूरक उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. आज पंचवीस वर्षांनी ही या झाडांना फुले, फळे बहरलेली आहेत.
लोकसहभागासाठी यांचा पुढाकार...
सरपंच जगन्नाथ सप्रे, उपसरपंच रामदास बाबर, माजी सरपंच सुहास पाटील, शिक्षक विश्वनाथ सपकाळ, जगन्नाथ पाटोळे, किरण सपकाळ, वसंत पवार, जगन्नाथ सपकाळ, आबाजी सपकाळ, नवनाथ सपकाळ या लोकांनी पुढाकार घेवून लोकसहभागातून या गावाची वनराई केली आहे.
पाणी नाही, पण जिद्द अफाट!
विशेष म्हणजे, आजही या गावाला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नाही. तरीही ग्रामस्थांनी विहिरी खोदून, ठिबक सिंचनाचा वापर करून झाडांना पाणी पुरवलं. प्रत्येक कुटुंब स्वतःच्या झाडांची जबाबदारी घेतं-खत, पाणी, निगा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.
गाव करी ते राव काय करी
गावातील प्रत्येक घरांसमोर अंगण आणि मोकळी जागा ठेवण्यात आली. याच जागेत ग्रामस्थांनी झाडे लावण्यास सुरुवात केली. आंबा, फणस, चिकू, जांभूळ, पेरू, डाळिंब, अंजीर, सिताफळ, रामफळ, बदाम यांसारख्या फळझाडांसोबतच विविध औषधी आणि फुलझाडांची लागवड करण्यात आली. आज खाजगी जागेतच सुमारे 3000 पेक्षा अधिक झाडे बहरली आहेत, तर सार्वजनिक जागांसह हा आकडा सात हजारांच्या पुढे गेला आहे.