Talasari Car Showroom Pollution Pudhari
पालघर

Talasari Car Showroom Pollution: वाहन शोरूमची निष्काळजीपणा; महामार्गालगत ऑइलमिश्रित सांडपाणी सोडून पर्यावरण व आरोग्य धोक्यात

वडवली (तलासरी) येथील प्रकार उघड; ग्रामस्थांचा कारवाईचा आग्रह, प्रशासन चौकशीच्या तयारीत

पुढारी वृत्तसेवा

तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत गृप ग्रामपंचायत वडवलीच्या हद्दीत असलेल्या एका शोरूम कडून वाहन वॉशिंगनंतर निघणारे पेट्रोल, डिझेल व ऑइलमिश्रित पाणी कोणतेही शास्त्रीय नियोजन न करता थेट महामार्गालगत उघड्यावर सोडण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला प्रश्न निर्माण झाला असून अपघात व रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

सदर शोरूम मध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहन धुलाई केली जाते. मात्र धुलाईनंतर निर्माण होणाऱ्या दूषित पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही शोषखड्डे, ड्रेनेज व्यवस्था अथवा ऑइल सेपरेटर यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. परिणामी ऑइलमिश्रित पाणी थेट महामार्गालगत उघड्यावर साचत असून या साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच हे पाणी जमिनीत मुरल्यास भूजल प्रदूषित होण्याचीही शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

या गंभीर प्रकाराकडे संबंधित ग्रामपंचायत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ लक्ष देऊन शोरूम व्यवस्थापनावर कारवाई करावी, तसेच योग्य निचरा व्यवस्था व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्याची सक्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणी शोरूमच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, “येत्या दोन दिवसांत संपूर्ण सांडपाणी बाहेर जाणे थांबवून शोरूमच्या आवारातच ड्रेनेज खड्डा तयार करून त्यामध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावून कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
वृषाली हरड, ग्रामविकास अधिकारी वडवली सवणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT