

सफाळे : शिरगावच्या स्वच्छ, निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर रविवारी शक्ती, शिस्त आणि संघभावनेचा भव्य संगम अनुभवायला मिळाला. 38 वी सीनियर राष्ट्रीय दोरीखेच (र्ढीस ेष थरी) अजिंक्यपद स्पर्धा पं. गौतम कौल चषक 2025-26 चे उद्घाटन प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण स्पर्धेमुळे शिरगाव बीच अक्षरशः क्रीडामय बनला असून, खेळाडूंच्या जोरदार लढतींकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
उद्घाटनप्रसंगी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितले की, “खेळामुळे व्यक्तिमत्त्व घडते, आत्मविश्वास वाढतो आणि खेळाडूंनी खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. दमनच्या धर्तीवर शिरगाव व चिंचणी येथील समुद्रकिनारे विकसित करून या भागाला क्रीडापर्यटनाचे केंद्र बनवले जाईल.” त्यांच्या या घोषणेला उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली. राष्ट्रीय टग ऑफ वॉर फेडरेशनचे अध्यक्ष हरीशंकर गुप्ता यांनी दोरीखेच हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त खेळ असल्याचे स्पष्ट करताना सांगितले की, “या खेळातून नोकरीच्या संधी, स्कॉलरशिप आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे दरवाजे खुले होतात. महाराष्ट्रात ही स्पर्धा होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
या स्पर्धेत 22 राज्यांतील पुरुष, महिला तसेच मिश्र 4+4 गटांमधील तब्बल 45 संघ सहभागी झाले असून, प्रत्येक सामन्यात ताकद, तंत्र आणि संघभावनेचा कस लागणार आहे. महाराष्ट्रासह केरळ, गुजरात तसेच उत्तर भारतातील बलाढ्य संघांमुळे स्पर्धा अधिकच चुरशीची बनली आहे. उद्घाटन सोहळ्याला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, मंत्रालयाचे सहाय्यक सचिव मकरंद देशमुख, पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिरगावचे जंगी बाबा, सामाजिक कार्यकर्त्या निशा सवरा यांच्यासह आशिया व भारत टग ऑफ वॉर संघटनेचे सचिव मदन मोहन, महाराष्ट्र राज्य टग ऑफ वॉर फेडरेशनच्या अध्यक्षा माधवी पाटील, पालघर जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष सुजित पाटील, सचिव विनय सावे, उपाध्यक्ष प्रमोद पाटील,योगिता पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.