Chilli Price Pudhari
पालघर

Chilli Price: यंदा मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका!

ग्रामीण भागात विशेष परिणाम, तरीही मसाला कूटण्यासाठी गृहिणींची लगबग

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: यंदा मिरची सह इतर महत्वाच्या मसाल्याच्या पदार्थांवर लांबलेल्या पावसाचा परिणाम झाल्याने उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे.त्यामुळे मसाला पदार्थांचे दर चांगलेच तिखट झाले असून ठाणे पालघर जिल्ह्यात आपला घरचा मसाला म्हणून वर्षभरासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आणि वेगवेगळे मसाल्याचे जिन्नस खरेदी करून उन्हात तापवणे , साधारण भाजण्या सारख्या प्रक्रिया करून दळून आणलेल्या मसाला साठवणूक तरतुदीवर विशेष परिणाम झाला आहे .

त्यामुळे मसाला तयार करताना यंदा महागाईचा ठसका सहन करावा लागत आहे .मात्र तरीही जिल्ह्यातील ग्रामीण भागात मसाला पदार्थ उन्हात वाळवण्याची व मसाला डंकवर मसाला कुटण्याची लगबग सुरू आहे.

यंदा लांबलेल्या पावसाचा फटका भाजीपाला व अन्य पिकांना बसला असून, त्यात मिरची व मसाले पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे मागच्या वर्षी च्या तुलनेत यंदा सर्व प्रकारच्या मसाला पदार्थांचे भाव वधारले आहेत. त्यामुळे आधीच महागाईची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना भाववाढीमुळे मसाला पदार्थ दरवाढीचा ठसका करत आहेत.

खडा किंवा गरम मसाल्यांच्या

भावात सध्या मोठी तेजी आली आहे. लागवडीच्या वेळी अतिपावसाने जिरे, धण्याचे मोठे नुकसान झाले. जागतिक बाजारात जायपत्री, लवंग यांच्या पुरवठ्यात अडथळे आल्याने टंचाई आहे. त्यातच लग्नसराई, सणवार, रमजान महिना आदींमुळे मसाल्याची मागणी प्रचंड वाढल्याने गरम मसाल्याच्या जिन्नसांत दरवाढ झाल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मसाले उत्पादनालाही बसला आहे. परिणामी, मसाल्यासाठी वापरण्यात येणारे जिरे, धने, जायपत्री, लवंगच्या उत्पादनात घट झाल्याने पुरवठा मंदावला आहे. त्यातच सध्या लग्नसराई, सणवारामुळे मागणीत वाढ झाल्याने मसाल्याच्या किमतीत दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन लग्नांच्या हंगामात मसाल्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबांनी याची झळ सोसावी लागत आहे.

उन्हाळ्यामध्ये मसाला व इतर पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या मिरची मसाल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते; परंतु मागणी असूनही आवक घटल्यामुळे दर यावर्षी वाढल्याचे चित्र आहे. यंदा लांबलेला पाऊस व किडींमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच दर गगनाला भिडले आहेत. पावसाळ्यास दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहेत. मात्र पुढे भाव आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पालघरच्या ग्रामीण भागात दरसाल येणाऱ्या पावसाळ्यासाठी सुकी मच्छी , सफेद कांदे , कडधान्य , पापड , लोणचे , तांदूळ साठवून ठेवण्यात येतात .यामध्ये वर्षभरासाठी पुरेल असा आपल्या आवडीच्या चवीचा मसाला कुटून साठविण्यात येतो . त्यासाठी लागणाऱ्या मिरची सह मसाल्याच्या विविध प्रकारच्या पदार्थांच्या खरेदीसाठी मसाला दुकानात मोठी गर्दी होत असून मसाला व हळदी कुटण्याचा सद्ध्या सिझन सुरू झाला आहे .

हा मसाला कांडण डंक किंवा गिरण्यांवर जाऊन कुटावा अथवा दळावा लागतो .त्याची लगबग सद्ध्या दिसून येत असून मसाला गिरण्यांवर सकाळ पासून गृहिणी गर्दी करत आहेत . वसई पूर्वेतील अश्याच प्रकारच्या एका फुग्याच्या मसाला गिरणीवर मसाला कुटताना महिला दिसून येत आहेत.

घरांत आता पॅकिंग, रेडीमेड मसाले

मिरचीसह इतर साहित्य विकत आणून मसाला तयार करण्यापेक्षा बहुतांश घरांमध्ये रेडिमेड पॅकिंगचा मसाला वापरला जातो. हा मसाला २०० ते १,२०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. बाजारात १००, २००, ५०० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे.मात्र रेडी मसाल्यात घरच्या केलेल्या मसाल्याला हवी ती चव नसते.

उत्पादन का घटले?

लागवडीच्या वेळी काही राज्यात अतिपावसाने धने व जिऱ्याचे नुकसान झाले. बाजारात मसाल्याच्या सर्व पदार्थांची आवक पुरेशी आहे. लग्नसराई, सणवार, रमजानमध्ये खाद्यपदार्थांमध्ये मसाल्याचा वापर केला जातो. घरोघरी या दिवसांत मसाला तयार केला जातो. त्यामुळे मागणी वाढली.

किती टक्क्यांनी वाढले दर

बहुतांश मसाल्याच्या पदार्थांचे भाव ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे भाव सध्या तरी आवाक्यातच आहेत.

लांबलेल्या पावसामुळे मसाला पिके कमी उत्पादित झाले असून, आवक कमी झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या मसाला पदार्थांचे भाव वाढले आहेत. येत्या काही महिन्यांत मिरचीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सुरेश जैन, व्यापारी
आम्ही शेतकरी असल्याने दरसाल पावसाळ्याच्या शेतीसाठी जवळपास ४ महिने शेत कामासाठी व्यस्त असतो .यावेळी रोजच्या स्वयंपाकाला लागणारे टिकाऊ साहित्य जसे कडधान्य, डाळी, सुकी मासळी , कांदे आदी सामानासह मीठ मसाला साठवून ठेवावा लागतो .मात्र यंदा मसल्यांना खूप भाव झाला आहे .घरचा मसाला तर लागतोच .त्यामुळे नाईलाजाने आम्हाला दर वाढला तरी मसाला कुटावा लागला .
सुमित्रा पाटील,गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT