

खानिवडे: मुंबई अहमदाबाद महामार्गावर मार्गालगत कचरा फेकून जाळला जात असल्याने धुराचे लोळ निर्माण होत आहेत . यामुळे चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून चालकांसह आजू बाजूच्या रहिवाश्यांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे . त्यामुळे कचरा फेकणाऱ्यावर व जाळून प्रदूषण करणाऱ्यांवर संबंधित विभागाने कारवाई करून वचक बसवावा अशी मागणी चालक व गावकरी करत आहेत .
विरार फाटा येथे महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या पूर्वेला अश्याच प्रकारे फेकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लावलेल्या आगीमुळे प्रचंड धुराचे लोळ दिसून येत होते.उग्र वासाचा व काळाकुट्ट धूर पसरल्याने येथून चालणाऱ्या चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला होता. तर परिसरात प्रदूषण निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास होत होता.यामुळे कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.
वसई तालुक्याच्या पूर्वेतून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या कडा म्हणजेच अवैध्य डंपिंग ग्राऊंडच्या जागा बनल्या आहेत . महामार्गावरील घोडबंदर ते सकवार या दरम्यान दोन्ही वाहिन्यांच्या कडेला केर कचऱ्यासह रासायनिक कचरा, तोडलेल्या बांधकामांचा मलबा , ट्रकमधील वाहतूक सामानाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारा कचरा , लाद्यांचे वेस्टेज व पेटवल्यानंतर भयंकर काळा धूर सोडणारे उग्र वास येणारे प्लास्टिक वेस्टेज , सुका , ओला कसाही कचरा सद्ध्या महामार्गाच्या कडांवर राजरोस फेकला जात आहे . हे सर्व फेकण्यासाठी फेकणारे रात्रीची वेळ निवडत असून शक्यतो गावाच्या थोडे दूर असलेली निर्जन जागा शोधतात.
यामुळे महामार्गाच्या कडा म्हणजे बिनदिक्कत , विना कटकट कोणाच्याही अडथळ्या शिवाय डंपीगचे स्थान बनत असल्याचे निदर्शनास येत आहे . यामुळे येथून पायी वावर करणाऱ्या नागरिकांना , शेजारील शेतीला व शेतकऱ्यांना , दुचाकी स्वारांना व इतर वाहनांच्या चालकांना जळताना निर्माण होणाऱ्या धुरासह कुजलेल्या वासाचा सामना करावा लागतो .
तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असलेल्या रासायनिक कचऱ्यामुळे रोगराईची शक्यताही आहे .याकडे वाहतूक पोलीस,महसूल व संबंधित महामार्ग विभागाकडून सपशेल दुर्लक्ष्य केले जात असल्याची भावना वाहन चालक , शेतकरी व नागरिकांत निर्माण होत आहे . कारण अश्या प्रदूषण बहाद्दूरांवर कारवाई केल्याचे दिसण्यात येत नाही .
फेकलेल्या या कचऱ्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे महामार्गाशेजारील असलेल्या शेतीला होत आहे .तसेच या भागात सतत वावर असणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना होत आहे .सद्ध्या महामार्गावरील ससू नवघर,चिंचोटी ,पेल्हार ,बावखळ ,विरार फाटा ,कोपर व खानिवडे गावाची हद्द,व सकवार आदी भागात कचरा टाकला जात आहे . यामुळे प्रशासनाने व संबंधित विभागाने त्वरित लक्ष्य देऊन कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून आळा बसवण्याची मागणी करण्यात येत आहे .