दीपक गायकवाड
खोडाळा: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे निसर्गाच्या शतकानुशतकांच्या ठेव्यावर कुऱ्हाड कोसळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मौजे देवगाव फाटा ते श्रीघाट दरम्यानच्या सव्वा दोन किलोमीटरच्या पट्ट्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुमारे ६० आंब्याच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
स्थानिकांच्या दाव्यानुसार ही झाडे १५० ते २०० वर्षांपूर्वीची असून, पिढ्यानपिढ्या या वाटेवर सावली देणारी ही झाडे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
प्राप्त छायाचित्रात रस्त्याच्या मधोमध आडवे पडलेले अवाढव्य आंब्याचे खोड, त्याचे छाटलेले फांद्या आणि करवतीने तुकडे करणारे मजूर स्पष्ट दिसत आहेत. आजूबाजूला दाट हिरवाई असूनही, रस्ता रुंदीकरणासाठी ही झाडे पाडली जात असल्याचे चित्र आहे.
प्रत्येक १२ वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ मध्ये होत आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या रामकुंड येथे ध्वजारोहणाने या पर्वाची सुरुवात होणार असून, जुलै ते सप्टेंबर २०२७ या कालावधीत मुख्य शाही स्नान पर्वणी होणार आहेत. २४ जुलै २०२८ रोजी ध्वज उतरवल्यानंतर या कुंभपर्वाची सांगता होईल.
रस्ते रुंदीकरण, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी ही कामे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, त्यासाठी शेकडो वर्षे जुन्या वृक्षसंपदेचा बळी दिला जात असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वृक्षतोड करताना वन विभागाची परवानगी घेण्यात आली होती का, मोबदल्यात वृक्षारोपणाचे नियोजन काय, आणि पर्यायी मार्गाचा विचार करण्यात आला होता का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
१५०-२०० वर्षांचे आंब्याचे झाड हे केवळ सावली देत नाही, तर जैवविविधता, भूजल पातळी आणि स्थानिक परिसंस्थेचा कणा असते. त्याची भरपाई नवीन रोपांनी होऊ शकत नाही, अशी भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.
सिंहस्थासारख्या धार्मिक पर्वासाठी निसर्गाचा समतोल राखणे अपेक्षित असताना, विकासाच्या नावाखाली हिरवाईचा संहार होत असल्याने प्रशासनाने याबाबत पारदर्शक खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्ष तोडीचा प्रस्ताव केला होता. त्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. देवगाव ते श्रीघाट या दरम्यान सव्वा दोन किलोमीटरच्या अंतरावर एकूण ६० आंब्यांची झाडे तोडली जाणार असून त्याबदल्यात वृक्षांची लागवड करणार असल्याचे लिखित बंधपत्रात. (प्रतिज्ञापत्रात) घेतले आहे.- शेखर देवकर, रेंज फॉरेस्ट ऑफीसर, त्र्यंबकेश्वर.
रस्ते रुंदीकरण गरजेचे असले तरी या झाडांची कत्तल न करता त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने इतरत्र पुनर्रोपण करणे शक्य होते. प्रशासनाने सोपा मार्ग म्हणून सरळ कुऱ्हाड चालवण्याचा पर्याय निवडला, जो अजिबात सहन करण्यासारखा नाही.- तुकाराम रोकडे, नागरिक.
विकास कामांना आमचा अजिबात विरोध नाही, पण हा विकास निसर्गाचा बळी देऊन नको.विकास कामांच्या आड निसर्गाची अशी कत्तल सुरू राहिली, तर येत्या काळात गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल प्रशासनाने यापुढे होणारी वृक्षतोड तात्काळ थांबवावी आणि उर्वरित परिसर सुरक्षित ठेवावा.- तुषार दोंदे, पर्यावरण प्रेमी.