Neral Kashele Student Bus Service: बससेवा बंद होताच २५० विद्यार्थ्यांची पुन्हा पायपीट; शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

नेरळ-वाकसमार्गे कशेळे जाणारी विद्यार्थ्यांची बस अचानक बंद;
Neral Kashele Student Bus Service
Neral Kashele Student Bus Servicepudhari
Published on
Updated on

नेरळ: नेरळ-वाकस मार्गे कशेळे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली बससेवा शुक्रवार, ११ सप्टेंबरपासून बंद करण्यात आल्याने परिसरातील विद्यार्थ्यांची पुन्हा पायपीट सुरू झाली आहे. सुमारे २५० विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला असून, बससेवेअभावी त्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेरळ-कशेळे मार्गालगत असलेल्या नेवाळी, कोलिवली, वाकस, चोरावले, मिरचोली आदी गावांसह विविध आदिवासी वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना नेरळ येथील शाळांमध्ये जाण्यासाठी मोठ्या अंतराची पायपीट करावी लागत होती.

Neral Kashele Student Bus Service
Thane Noise Pollution: डीजे-डॉल्बीचा दणदणाट कमी; ढोल-ताशा, बेंजोमुळे मात्र ध्वनिप्रदूषण कायम

विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन, किसान क्रांती संघटना आणि आरपीआय आठवले गट यांच्या माध्यमातून परिवहन मंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

या मागणीनंतर ३ ऑगस्टपासून नेरळ-वाकस मार्गे कशेळे बससेवा सुरू करण्यात आली. सेवा सुरू झाल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी बसचे पास काढले होते. विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास सुलभ व्हावा आणि त्यांची पायपीट कमी व्हावी, हा या सेवेमागील मुख्य उद्देश होता. आधी प्रवासी फेऱ्या बंद, आता विद्यार्थ्यांचीही सेवा बंद.

सुरुवातीला या मार्गावर प्रवाशांसाठी अतिरिक्त फेऱ्याही सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवसांनी प्रवासी फेऱ्या बंद करून केवळ विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू ठेवण्यात आली. आता विद्यार्थ्यांसाठीची ही सेवाही बंद झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Neral Kashele Student Bus Service
Third Mumbai Ganpati Decoration: गणेशोत्सव देखाव्यातून तिसरी मुंबईविरोधात जनजागृती

विशेषतः पाच किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसत आहे. बसची प्रतीक्षा करूनही सेवा उपलब्ध होत नसल्याने काही विद्यार्थ्यांना घरी परतावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, त्यांच्या नियमित शिक्षणावर परिणाम होत असून उपस्थिती आणि शैक्षणिक प्रगतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

पर्यायी वाहतूक व्यवस्थाही अपुरी.बससेवा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यायी वाहतुकीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही रिक्षाचालक विद्यार्थ्यांना इको रिक्षामधून शाळेत घेऊन जाण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोरील वाहतुकीची अडचण अधिकच गंभीर बनली आहे.

सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिवहन मंडळाने तातडीने लक्ष घालून नेरळ-वाकस मार्गे कशेळे बससेवा पूर्ववत करावी आणि ती नियमितपणे सुरू ठेवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. पालकांनीही प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन वाहतुकीचा कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेली बससेवा केवळ काही दिवसांत बंद होणे ही चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news