खानिवडे : वसई पूर्वेकडून जाणाऱ्या मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाड नाका येथील उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने उंच वाहनांना येथून मार्ग काढताना अडचणी निर्माण होत असून, अशी वाहने पुलाखाली अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रविवारीही एका उंच कंटेनरला पुलाच्या वरच्या कठड्याला धडकून अडकण्याची घटना घडली. मात्र नाक्यावर असलेल्या रिक्षाचालक, प्रवासी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चालकाला वेळीच सावध करण्यात आल्याने संभाव्य मोठे नुकसान टळले.
रविवारी दुपारी वज्रेश्वरीच्या दिशेकडून येणारे आणि गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी वळलेले ‘ब्लू बर्ड एक्स्प्रेस’ असे नाव असलेले बंद बॉडीचे कंटेनर प्रकारातील वाहन शिरसाड नाका उड्डाणपुलाखालून जाण्याचा प्रयत्न करीत होते. वाहनाचा बराचसा भाग पुलाखाली गेल्यानंतर त्याच्या अधिक उंचीमुळे मागील भाग पुलाच्या वरच्या कठड्याला अडकला. सुदैवाने वाहनाचा वेग अत्यंत कमी असल्याने मोठा अपघात टळला.
उंच वाहन पुलाखाली अडकण्याची शक्यता लक्षात येताच नाक्यावरील रिक्षाचालक, प्रवासी आणि नागरिकांनी वाहनचालकाला सावध केले. तसेच पुढील विरार फाटा येथील उड्डाणपुलाखालून जाण्याचा पर्यायी मार्ग दाखविण्यात आला. त्यानंतर चालकाने वाहन मागे घेत पर्यायी मार्गाने गुजरातच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला.
सुरवातीला या पुलाची उंची ही ठीकठाक होती.मात्र पावसाळ्यात पुलाखाली मोठे मोठे खड्डे पडले होते.ते बजावताना करण्यात आलेला भराव किंवा रस्त्याच्या पातळीतील बदल यामुळे वाहनांना उपलब्ध होणारी उंची आणखी कमी होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने पुलाची प्रत्यक्ष उंची व रस्त्याची पातळी यांची तांत्रिक पाहणी करून उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
शिरसाड नाका उड्डाणपुलाची उंची वाढविणे शक्य असल्यास त्याबाबत कार्यवाही करावी; अन्यथा पुलाखालील रस्त्याची पातळी कमी करून उंच वाहनांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या कमाल उंचीची स्पष्ट सूचना देणारे फलक लावावेत, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
महामार्गावरील पुलाची उंचीच संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आल्याने त्याखालून सर्वसाधारणपणे उंच वाहने सहज जाऊ शकतील, असा वाहनचालकांचा समज असतो. मात्र शिरसाड नाका येथील पुलाची प्रत्यक्ष उंची कमी असल्याने वाहनचालकांचा हा अंदाज अनेकदा चुकतो. परिणामी उंच कंटेनर, मालवाहू ट्रक यांसारखी वाहने पुलाखाली अडकून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या घटनांमुळे केवळ वाहनांचे नुकसान होण्याचा धोका नसून महामार्गा खालील नाक्यावर वाहतूक काही काळ ठप्प होऊन मोठी कोंडी निर्माण होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत एखादे अवजड वाहन पुलाखाली अडकल्यास त्याचा परिणाम दूरपर्यंतच्या वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.