पालघर शहर: सातपाटी खाडीकिनारी हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे. प्रदूषित पाण्यामुळे अथवा अति उष्ण वातावरणामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या घटनेमुळे स्थानिक मच्छीमारांकडून चिंता व्यक्त होत आहे.
पालघर तालुक्यातील सातपाटी खाडी किनारी हजारो मृत माशांचा खच पडल्याचे स्थानिक मच्छीरांच्या निदर्शनास आले. खाडीकिनारी अचानक हजारोंच्या संख्येने मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषित सांडपाणी सातपाटी, मुरबे, नवापूर खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून या प्रदूषित सांडपाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील जैवविविधतेवर संकट ओढवले आहे.
मासेमारी आणि माशांच्या प्रजननात मोठी घट झाली असून मच्छीमार आणि आदिवासी समुदायाचे आरोग्य आणि अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. खाडीच्या परिसंस्थेचे दीर्घकालीन नुकसान होत आहे.
त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे सातपाटी, मुरबे, नवापूर खाडीतील सागरी मत्स्यसंपदेवर होणाऱ्या परिणामांचा सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारे शास्त्रीय अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे दि सातपाटी फिशरमन सर्वोदय सहकारी सोसायटीने केली आहे.