सफाळे : सफाळे रेल्वे स्थानकाजवळील कपासे येथील ठाकूरपाडा परिसरात राहणाऱ्या राजश्री पडवळे (35) या महिलेला बाळंतपणासाठी सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता दुर्दैवाने तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास राजश्री पडवळे यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, सफाळे येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी ‘नॉर्मल डिलिव्हरी’ होईल असे सांगून त्यांना रात्रभर आरोग्य केंद्रात दाखल करून ठेवले. मात्र सोमवारी सकाळी अचानक रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबीयांना खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर राजश्री पडवळे यांना तातडीने सफाळे येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तपासणी केल्यावर बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर पडवळे यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन संबंधित डॉक्टरांकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. “जर पेशंटची प्रकृती गंभीर होती, तर रात्रभर तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात का ठेवले? वेळेवर पुढील उपचारासाठी रेफर केले असते, तर बाळाचे प्राण वाचले असते,” असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
सदर महिलेला बाळंतपणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता दुर्दैवाने बाळंतपणा आधीच बाळाने शी केली. त्यामुळे त्यांना पुढे नेण्याचा सल्ला दिला होता.डॉ. मनोज कुमार विश्वकर्मा, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे