

पालघर ः मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, दिवाळीच्या सुट्ट्या संपवून परतीच्या प्रवासातील वाहनांमुळे महामार्गावर रविवारी रात्री मोठी कोंडी निर्माण झाली होती. सातिवली उड्डाणपूल परिसरात तब्बल 9 तास ही कोंडी होती.पहाटे ही कोंडी हटवण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.
सातिवली येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या मुंबई बाजूकडील जोड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रविवारी रात्री मोठी वाहतूक कोंडी झाली होती.मुंबई वहिनीवर तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीला कंटाळून गुजरात वहिनीवरुन विरुद्ध दिशेने आलेल्या कार आणि अन्य वाहनांमुळे गुजरात वाहिनीवरही वाहतूक कोंडी झाली होती.सोमवारी पहाटे पाच वाजता वाहतूक कोंडी सोडवण्यात महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलिसांना यश आले.
दोन दिवसांपासून पालघर तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस सुरु असल्यामुळे महामार्गावरील सातिवली येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही दोन्ही बाजू कडील जोड रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रविवारी दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने पर्यटनासाठी बाहेरगावी गेलेल्यांची माघारी परतण्यासाठी सुरुवात झाली होती. सातिवली उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजू कडील जोड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होतो, अशात वाहनांची संख्या वाढल्याने रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडीतुन मार्ग काढण्यासाठी अनेक वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने आणल्यामुळे गुजरात वहिनीवरही वाहतूक कोंडी झाली होती.
रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांना बाजूला करून गुजरात वाहिनी वाहतूक संथगतीने सुरु केल्यानंतर मुंबई वाहिनीवरील वाहतूक कोंडी सोडवण्याला प्राधान्य दिले.सोमवार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी सोडवण्यात महामार्ग सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
पालघर तालुक्यातील सातिवली येथे उड्डाणपूल उभारणीचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु आहे.आजतागायत कामाची रखडपट्टी सुरूच आहे. उड्डाणपुलालगतचे अरुंद सर्व्हिस रोड आणि जोड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियोजन आहे.कामाची संथगती पाहता उड्डाणपुलावरून वाहतूक सुरु होण्यासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.