विरार : नालासोपारा पूर्वेकडील शिर्डी नगर भीम डोंगरी या ठिकाणी बुधवारी (दि.25) रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिक आणि पालिका प्रशासन अग्निशमन जवान यांच्या मदतीने मुख्य रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा बाजूला केला. सदर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. परतीच्या पावसात घडलेली ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे.
पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अति मुसळधार पाऊस पडत आहे. या परतीच्या पावसामुळे सर्वत्र ठिकाणी पाणी साचले होते. यामध्येच नालासोपारा पूर्वेकडील शिर्डी नगर भीम डोंगरी या ठिकाणी अचानक दरड कोसळली. यामुळे नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई विरार शहरात 15 ठिकाणी दरड कोसळण्याची ठिकाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निश्चित करण्यात आली होती. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमन जवानांच्या माध्यमातून काटेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या डी प्रभागात ही घटना घडली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बैठ्या चालींचे निर्माण झाले आहे. दीड हजाराहून अधिक नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. दोन वर्षांपूर्वी देखील वसईच्या वागरल पाडा या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये आठ ते नऊ लोकांना आपला नाहक जीव गमावा लागला होता. रात्री अचानक घडलेल्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिक एकत्रित येत आपापल्या घरातील व्यक्तींची सुरक्षित असल्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर आलेला मातीचा मलमा बाजूला केला अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जयेश कदम यांनी दिली.