पुढारी ऑनलाईन डेस्क: माता वैष्णो देवी यात्रेदरम्यान आज (दि.२ सप्टेंबर) मोठा अपघात झाला. यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्याने दोन महिला यात्रेकरू ठार झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. तर एक मुलगी जखमी झाली आहे. या दुर्घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले. जखमी भाविकांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
यात्रेदरम्यान भाविकांनी सतर्क राहून मार्गाची स्थिती लक्षात घेऊन पुढे जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरड कोसळल्याने यात्रा मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी मार्ग मोकळा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वैष्णो देवी मंदिर हे देवी दुर्गाला समर्पित १०८ शक्तीपीठांपैकी एक आहे. हे भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, नवरात्रीसारख्या सणांमध्ये, भाविकांची संख्या एक कोटीपर्यंत पोहोचते. वैष्णो देवी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. वैष्णोदेवी मंदिराचे व्यवस्थापन आणि प्रशासन श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाद्वारे हाताळले जाते. त्याच्या मंडळात नऊ सदस्य आहेत.