वैभववाडी : सोमवारी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने भुईबावडा घाटाची दाणादाण उडाली आहे. सात ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर संपूर्ण घाटातील गटारे दगड मातीच्या गाळाने भरली आहेत. तर ठिकठिकाणी मोऱ्या गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे सोमवारी सायंकाळपासून घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक वाहने घाटात अडकून पडली आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरडी हटविण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र रात्रीच्या अंधारामुळे या कामात अडथळा येत होता. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु कारण्यात आले आहे. करूळ घाटही बंद असल्यामुळे राधानगरी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
तालुक्यात सोमवारी ढगाळ वातावरण व दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र सायंकाळी ४ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सह्याद्री पट्यातील भुईबावडा, करूळ परिसरात तर ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्याचा सर्वाधिक फटका भुईबावाडा घाटाला बसला. यावर्षी करूळ घाट बंद असल्यामुळे वाहतूकीची सर्व मदारही भुईबवाडा घाटावर आहे. घाटाने यावर्षी पावसाळ्यात चांगलीच साथ दिली. दरड कोसळण्याची मोठी घटना घडली नाही. त्यामुळे घाटातून सुरळीत वाहतूक सुरु होती. मात्र परतीच्या पावसाने घाट मार्गाची अत्यंत दुरावस्था केली आहे.
घाटात सात आठ ठिकाणी मोठया दरडी कोसळून रस्तावर आल्या आहेत. तर संपूर्ण घाटातील गटारे गाळानी भरली आहेत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे चिखल माती पसरली आहे. त्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. तसेच घाटातील मोऱ्या गाळाने भरल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे. सोमवारी सायंकाळ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसिबिच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरवात करण्यात आली आहे. रात्री अंधारामुळे कामात अडथळा येत होता. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत तहसीलदार सूर्यकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता विजय जोशी कर्मचाऱ्यांसह घाटात हजर होते. घाटात अडकलेल्या छोट्या वाहनांना रस्ता मोकळा करीत बाहेर काढले. मात्र मोठी अवजड वाहने घाटाच्या दोन्ही बाजूला अडकून पडली आहेत. त्यामुळे भुईबावडा घाटातील वाहतूक फोंडा घाट राधानगरी मार्गे वळण्यात आली आहे.