प्रथमेश तावडे
विरार: नेपाळमध्ये आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने कैलास मानसरोवर यात्रेचा मार्गच हादरवून सोडला आहे. अचानक आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणात हाहाकार उडवला असून, अनेक यात्रेकरू अडकले आहेत. या जीवघेण्या संकटातून विरारचे माजी नगराध्यक्ष आणि जीवदानी ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडूलकर थोडक्यात बचावले.
या घटनेचा थरारक गोष्ट म्हणजे, ज्या हॉटेलमध्ये तेंडूलकर मुक्कामी होते, ते त्यांनी दुर्घटनेच्या अवघ्या चार ते पाच तास आधी सोडले होते. त्यानंतर आलेल्या महापुरात हेच हॉटेल पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे काही तासांचा फरक तेंडूलकरांच्या जीवावर बेतणाऱ्या संकटाला टळला.
तेंडूलकर कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेले असून, सध्या ते तब्बल १८ हजार ५०० फूट उंचीवरील डोलमा ला पास येथे पोहोचले आहेत. मात्र, त्यांच्या मागून येणाऱ्या अनेक भाविकांचा मार्ग फ्लॅश फ्लडमुळे खंडित झाला आहे.
अचानक आलेल्या पुराच्या तडाख्याने काही भागांत मोठे नुकसान झाले असून, यात्रेकरू अडकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारत, नेपाळ आणि चीनच्या यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मात्र, तेंडूलकरांच्या मागे असलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता कायम आहे.तेंडूलकर सुखरूप असल्याची माहिती विरारमध्ये पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांसह परिचितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी मुक्काम केला, तेच हॉटेल महापुरात वाहून गेल्याची माहिती समोर आल्याने या घटनेने विरारमध्येही खळबळ उडाली आहे.