Konkan Coconut Farming: कोकणचा ‘कल्पवृक्ष’ नारळ; ८०० कोटींची उलाढाल, लाखो रोजगारांचा आधार

४५ हजार हेक्टरवर लागवड, ३० कोटी नारळ उत्पादन, ८०० कोटींची उलाढाल
 Coconut Farming
Coconut FarmingPudhari
Published on
Updated on

जयंत धुळप

रायगड: कोकण आणि नारळ (माड) यांचे नाते शतकानुशतके अतुट राहिलेले असून कोकणचा कल्पवृक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. हिरवीगार भातशेती, अथांग समुद्र आणि त्याला किनार लाभलेली सुंदर माडाची बागायत ही कोकणाची खरी ओळख आहे.

कोकणातील हवामान, जमीन आणि मुबलक पाऊस नारळाच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल असल्यामुळे देशातील नारळ उत्पादनात आणि अर्थव्यवस्थेत कोकणाचा वाटा मोलाचा मानला जातो. १ सप्टेंबर या जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने कोकणातील या समृद्ध परंपरेला आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला विशेष महत्त्व अधोरेखीत होते.

 Coconut Farming
Expired Food Products Racket: तुर्भेत मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री; 'एफडीए'कडून पर्दाफाश

महाराष्ट्र राज्याच्या कृषी आणि सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार, कोकणात ४५ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड आहेे. कोकणातील किनारपट्टीच्या चारही जिल्ह्यांमधून प्रतिवर्षी सुमारे २५ ते ३० कोटी नारळांचे उत्पादन घेतले जाते.

शहाळी, सुके खोबरे, काथ्या आणि इतर उपउत्पादने मिळून कोकणातील नारळ क्षेत्राची एकूण वार्षिक उलाढाल अंदाजे ८०० कोटी रुपयांच्या घरात जाते. यामध्ये केवळ शहाळ्यांच्या (नारळ पाणी) विक्रीतून वर्षाला ३५० कोटींहून अधिक उलाढाल होते. याशिवाय काथ्या उद्योग, कोकोपीट, नारळ तेल आणि झापांच्या साहित्यातून वर्षाला सुमारे २०० कोटींचे उत्पन्न मिळते.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या चारही किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये नारळाचे मोठे उत्पादन घेतले जाते. समुद्रकिनाऱ्यालगतची रेतीयुक्त जमीन या बागायतीसाठी सर्वाधिक योग्य मानली जाते.

सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुरला, देवगड; रत्नागिरीतील गुहागर, दापोली; रायगडमधील श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड आणि पालघरमधील वसई, डहाणू हे भाग नारळ उत्पादनात अग्रेसर आहेत.

 Coconut Farming
Old Monk Sales Ban: राज्यात 'ओल्ड मंक' च्या विक्रीवरील बंदी कायम; स्थगिती हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार

कोकणात प्रामुख्याने श्रीवर्धनी रोशा, बाणवली, प्रताप आणि संकरित जातींची लागवड दिसून येते. श्रीवर्धनी रोशा ही जात विशेषतः गोड पाण्यासाठी आणि मऊ खोबऱ्यासाठी प्रसिद्ध असून तिच्या शहाळ्याला बाजारात सर्वाधिक भाव मिळतो. बाणवली ही स्थानिक जात वादळ आणि रोगांना सहनशील मानली जाते, तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ‘प्रताप’ ही जात उच्च उत्पादनासाठी ओळखली जाते.

अर्थकारण, रोजगाराचा आधार

कोकणातील ग्रामीण भागातील १ लाखाहून अधिक शेतकरी आणि मजुरांचा रोजगार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे नारळ शेतीवर अवलंबून आहे. नारळाच्या बागांमध्ये सुपारी, काळी मिरी, जायफळ, केळी आणि अननस यांसारखी आंतरपिके घेऊन शेतकरी प्रति हेक्टरी उत्पन्न दुपटीहून अधिक करत आहेत. तसेच नारळाच्या शेंडीपासून काथ्या आणि रोपवाटिकांसाठी लागणारे कोकोपीट तयार करून त्याची विक्री केली जाते.

उत्पादकांसमोरील प्रमुख आव्हाने

चार वर्षांपूर्वी आलेली निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळे आणि त्यानंतर अरबी समुद्रात वारंवार येणारी चक्रीवादळे यामुळे हजारो झाडे नष्ट होवून बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. याशिवाय नारळ झाडावरून उतरवण्यासाठी कुशल मजुरांची तीव्र कमतरता, तांबडा किडा व कोळी यांचा प्रादुर्भाव आणि प्रक्रिया उद्योगांची कमतरता या समस्यांमुळे नारळ उत्पादक शेतकरी अडचणीत येत असल्याची माहिती काही नारळ बागायतदारांनीच दिली आहे

भविष्यातील संधी, उपाययोजना

व्हर्जिन कोकोनट ऑईल (व्हीसीओ), नीरा, नारळाचे दूध, पावडर आणि पॅकेज्ड नारळ पाणी यांसारख्या प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास ही वार्षिक उलाढाल १५०० कोटी रुपयांच्या पार जाऊ शकते. नारळ उतरवण्यासाठी आधुनिक यांत्रिक उपकरणांचा वापर वाढवणे आणि नारळ बागांचा वापर कृषी पर्यटनासाठी करून पर्यटकांना स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव देणे, कोकणातील नारळ शेतीला नवे बळ मिळू शकते.

प्रक्रिया उद्योगांची जोड मिळणे गरजेच

कोकणातील या कल्पवृक्षाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प १ सप्टेंबर जागतिक नारळ दिनानिमित्त करणे गरजेचे आहे, मात्र त्याकरिता शासकीय पाठबळाची तीतकीच गरज आहे. वार्षिक ८०० कोटी रुपयांची उलाढाल करणारा कोकणातील नारळ व्यवसाय हा केवळ एक शेती प्रकार नसून तो कोकणच्या समृद्ध आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा पाठीचा कणा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगांची जोड मिळाल्यास कोकणातील नारळ शेती ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news