वाडा : मच्छिंद्र आगिवले
पृथ्वीवरून मधमाश्या जर नाहीशा झाल्या, तर मानवाकडे जगण्यासाठी फक्त चार वर्षे उरतील असे सूचक वक्तव्य शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी केले होते. वाडा तालुक्यातील सध्याची परिस्थिती बघता आइन्स्टाइन यांचे वाक्य गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे असे अनेक शेतकरी सांगतात. झपाट्याने वाढणारे शहरीकरण व विनाशकारी कारखान्यांचा वाढलेला उच्छाद यामुळे वाडा तालुक्यातील शेतकरी संकटात येण्याची शक्यता असून मधमाशांचा वावर रोडावल्याने फळधारणा होण्यात अडचणी येत असल्याचे तज्ज्ञ शेतकरी सांगतात.
वाडा हा शेतीप्रधान तालुका असून भात शेतीसह फळं, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनात हल्ली अग्रेसर होत आहे. कलिंगड, झेंडू, सफेदकांदा, कारली यासह अनेक पिकांमध्ये येथील शेतकरी प्रवीण होत असून आंबा, चिकू यांसारख्या फळांमध्ये मोठी उलाढाल या तालुक्यात होते. हल्ली अनेक शेतकरी मात्र चिंतेत असून वाढत्या प्रदूषणाने शेती संकटात सापडल्याचे अनेक शेतकरी सांगतात. फळं, फुलं व भाजीपाला यांसह सर्वच पिकांसाठी परागीभवन व फलन महत्वाचे मानले जात असून ही क्रिया घडवून आणणाऱ्या मधमाश्या हल्ली दिसेनाशा झाल्या आहेत.
वाढते शहरीकरण, कीटकांचा अधिवास नष्ट होणे, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, कीटकांना लागणारे खाद्यपदार्थ नष्ट होणे यांसह कारखान्याद्वारे होणारे बेसुमार प्रदूषण याला कारणीभूत असून मागील वर्षी जवळपास सहा महिने कोसळलेला पाऊस मधमाशांची कर्दनकाळ ठरल्याचे तज्ज्ञ शेतकरी अनिल पाटील सांगतात.
पिकांमध्ये परागीभवन व फलन क्रिया अतिशय महत्वाची असून कीटकांना केवळ आकर्षित करणे गरजेचे नाही तर त्यांना लागणारे परागण मकरंद व पौष्टिक घटक आपल्या पिकांमधून देणे गरजेचे आहे. मनुष्य मात्र निसर्गाकडून काय मिळते या हव्यासापोटी जगत असून निसर्गाला आपण काय देतो याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे आणि त्याचाच परिणाम आज मधमाशांची संख्या ही प्रचंड कमी झाली आहे असे फुलं उत्पादक शेतकरी दीपक पाटील सांगतात.
यावर्षी मधमाश्या जवळपास नाहीशा झाल्या असून ही चिंतेची बाब आहे, कृषी विद्यापीठासह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली असून जवळपास सहा महिने पाऊस कोसळल्याने मधमाश्याच्या जीवनचक्रात विपरीत बदल झाल्याचा अंदाज आहे, शास्त्रज्ञांनी याबाबत गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे अन्यथा शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांची भविष्यवाणी खरी व्हायला वेळ लागणार नाही.अनिल पाटील, कृषीभूषण, तज्ज्ञ शेतकरी, वाडा.
कलिंगड पिकाच्या फलन क्रियेसाठी मधमाशा मिळत नसल्याने आम्ही पारंपरिक पद्धती अवलंबिल्या मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला नाही, अनेकांनी कृत्रिम पद्धतीने पालन केलेल्या मधमाश्या आणल्या मात्र त्या पिंजऱ्यातून बाहेर निघायला तयार नसल्याचे काहींनी सांगितले. किरकोळ वाटणारी ही बाब अतिशय गंभीर रूप धारण करायला वेळ लागणार नाही.दीपक शंकर पाटील, झेंडू उत्पादक शेतकरी, गातेस खूर्द.