

ठाणे : ठाणे जिल्ह्यात आमनेसामने लढत महापालिकेत महायुतीत मोठी चुरस निर्माण करणारी ठरली असली तरी महापौर-उपमहापौर निवडीत मात्र, दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगरचे महापौरपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेले असून, नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर होईल. या पाचही ठिकाणी महापौर, उपमहापौर पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, तशी अधिकृत घोषणा 3 फेब्रुवारीला होईल.
ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी अनेक नावांची चर्चा असताना कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापौर पदासाठी शिवसेनेकडून शर्मिला पिंपळोलकर यांच्या व्यतिरिक्त पक्षातून कोणीच अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय गुंडाळला असून शिंदे सेनेच्या सत्तेत सामील होत उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांची वर्णी भाजपने लावली आहे.
कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या ॲड. हर्षाली थवील, तर उपमहापौर पदासाठी भाजपाकडून राहुल दामले यांनी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, भाजपचे नाना सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेच्या सत्ताकारणात मोठा राजकीय उलटफेर झाला असून निवडणूक एकमेकांविरोधात लढवलेले शिवसेना आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. शिवसेनेकडून कालानी गटाच्या अश्विनी कमलेश निकम यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपकडून अमर लुंड यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दिला. उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचे इतर पक्षांबरोबर मिळून 40 हे बहुमत एकत्र केले. भाजपचे 37 नगरसेवक निवडून आले आहेत.
मिरा-भाईंदर महापालिका महापौर पदासाठी भाजपकडून डिंपल मेहता व काँग्रेस-शिंदे शिवसेना या मिरा-भाईंदर विकास आघाडीतील काँग्रेसच्या रुबिना शेख यांनी तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील तर आघाडीतील शिवसेनेच्या वंदना विकास पाटील यांनी शुक्रवारी नगरसचिव दिनेश कानगुडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या मेहता व पाटील या उमेदवारांनी प्रत्येकी दोन तर शेख व वंदना या आघाडीच्या उमेदवारांनी प्रत्येकी एक असे एकूण 6 उमेदवारी अर्ज दाखल केले. यंदाचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
ही निवडणूक येत्या 3 फेब्रुवारी रोजी पीठासीन अधिकारी तथा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नियंत्रणाखाली होईल. इथे भाजपने 95 पैकी तब्बल 78 जागा जिंकल्याने आपसूकच पालिकेत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेस व शिंदे शिवसेनेला अनुक्रमे 13 व 3 जागा जिंकता आल्याने हे दोन्ही पक्ष मिरा-भाईंदर विकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी बाकावर बसतील.
महापौर पदावर घराणेशाही जिंकणार असल्याचा अंदाज दैनिक पुढारीने 23 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात व्यक्त केला होता. तो खरा ठरला असून भाजपचे स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांनी आपल्या वहिनी तथा माजी महापौर डिंपल मेहता यांना पुन्हा महापौरपदासाठी संधी दिली आहे.
भिवंडीत पुन्हा घोडेबाजार?
भिवंडी महापालिकेत सर्वाधिक 30 नगरसेवक निवडून आणणारी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरली असून, त्याखालोखाल 22 नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत.परिणामी, इथे महापौर, उपमहापौर पदासाठी जबरदस्त चुरस असून, केवळ 3 सदस्य निवडून आलेल्या भिवंडी विकास आघाडीचे माजी महापौर जावेद दळवी व 4 सदस्य निवडून आणलेल्या कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. त्यातून महापौर निवडणुकीत भिवंडीत पुन्हा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीमध्ये आजीव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. बहुमत नसतानाही भाजपने दर्शना त्रिपाठी यांचा अर्ज दाखल झाला. महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका नको म्हणून बहुजन विकास आघाडीने प्रफुल्ल साने यांचाही अर्ज दाखल केल्यामुळे गरज नसताना या महापालिकेत 3 फेब्रुवारीला निवडणूक अटळ आहे.