हनिफ शेख
पालघर: पालघरमधील जिल्हा परिषदेकडून 9 व 10 वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर संकट कोसळले होते.लोकप्रतिनिधींकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.अखेर जिल्हा परिषदेकडून हा निर्णय रद्द करून हे वर्ग सुरू राहणार असल्याचे एक नवीन पत्र काढल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.
2017 पासून पालघर जिल्हा परिषदे कडून जिल्ह्यातील एकूण 57 शाळांमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र यासाठीचा निधी नेमका कोणत्या विभागाने आणि कोणत्या हेड मधून द्यायचा याबाबत अनेकदा जवळपास दरवर्षीच खलबते होत होती आणि दरवर्षी हे वर्ग बंद करण्याचे आदेश पालघर जिल्हा परिषदेकडून काढण्यात येत होते.
मात्र नंतर विविध संघटना सर्वपक्षीय मंडळी लोकप्रतिनिधी यांच्या दबावानंतर हे वर्ग सुरू करण्यात येत होते. यंदाही असेच एक पत्र दोन दिवसांपर्वीच पालघर जिल्हा परिषदेकडून काढण्यात आले आणि नववी व दहावीचे वर्ग बंद होणार असल्याने अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली आणि लोकप्रतिनिधीकडून देखील या निर्णयाचा विरोध होऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
सुरुवातीला डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी समाज माध्यमाद्वारे या निर्णयाला विरोध केला यांशिवाय काल यानंतर पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,माजी बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यासह भाजपाच्या शिष्टमंडळांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली यानंतर जिल्हा परिषदेकडून हा निर्णय रद्द करून हे वर्ग सुरू राहणार असल्याचे एक नवीन पत्र काढल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.
2017 मध्ये हे वर्ग सुरू केल्यानंतर जिल्हा नियोजन समिती याशिवाय आदिवासी विकास विभागाकडून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत या वर्गांसाठी नियुक्त शिक्षक आणि इतर खर्च व्हावा असे पत्र देखील पालघर जिल्हा परिषदेकडून देण्यात आले होते. मात्र याबाबत कुठलीही कार्यवाही न झाल्याने वर्ग बंद पडू नये मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून हे वर्ग चालविण्यात येत होते.
मात्र शेष फंड हा पगारावर खर्च करणे अपेक्षित नसून विकास कामावर खर्च व्हावा असा शासकीय नियम असल्याने जर इतर निधीमधून जर हा खर्च होणार नसेल तर तेच फंडातून हा खर्च करणे शक्य नसल्याचे कारण देत पालघर जिल्हा परिषदेकडून हे नववी दहावीचे वर्ग या वर्षापासून बंद करण्याचे पत्र काढण्यात आले होते.
याशिवाय सर्व शिक्षकांना पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना देखील नववी आणि दहावी साठीच्या विद्यार्थ्यांची जवळच्या आश्रम शाळा किंवा खाजगी शाळांमध्ये सोय करावी कोणीही शाळाबाह्य राहू नये याची काळजी घ्यावी अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या.
या पत्रानंतर मात्र पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चांना उधाण आले होते आणि या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध देखील वाढला होता. हा निर्णय रद्द न झाल्यास मोठे आंदोलन देखील पालघर जिल्हा परिषदेसमोर होण्याची दाट शक्यता होती.
शाश्वत निर्णयाची अपेक्षा
पालघर जिल्हा परिषदेच्या नववी आणि दहावी वर्ग बंद करण्याच्या आदेशानंतर दैनिक पुढारी मध्ये चार एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित झाले होते. कारण की पालघर जिल्हा हा आजही भौगोलिक दृष्ट्या अतिशय दुर्गम भागात पसरलेला आहे. या ठिकाणी आजही अनेक गाव पाड्यात आर्थिक सक्षमता नसल्याने या शिक्षणाचा मोठा आधार येथील पालकांना आहे.
मात्र आपल्या गावातील शाळेतील नववी दहावीचे वर्ग बंद झाल्यास विद्यार्थ्यांना घरापासून लांब आश्रमशाळा किंवा तालुक्याच्या ठिकाणी खाजगी शाळेत जावे लागले असते आणि याला अनेक पालकांची मानसिक तयारी देखील नव्हती यामुळे अनेक विद्यार्थी थेट शिक्षणापासूनच वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता.
या आशयाची बातमी देखील पुढारी मध्ये प्रसिद्ध झाली होती. याशिवाय या 57 शाळा वर काम करणाऱ्या शिक्षकांवर देखील नऊ वर्षे काम करून बेकारीची कुराड कोसळणार होती याबाबतही या बातमीतून प्रकाशझोत टाकण्यात आला होता त्याच दिवशी निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त होत आहे.