डहाणू : पालघर जिल्ह्यात आगामी काही दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून, रात्री आणि पहाटे थंडीचा जोर वाढणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, १४ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात पावसाची कोणतीही शक्यता नसून आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहणार आहे.
या काळात कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसा उष्ण वातावरण, तर रात्री आणि पहाटे तुलनेने अधिक थंडी जाणवणार आहे. या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भात व नागलीच्या काढणी-मळणीची कामे वेळेत पूर्ण करावीत, असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिला आहे.
हवामान अंदाजानुसार, सकाळच्या वेळेत सापेक्ष आर्द्रता ७६ ते ९५ टक्के, तर दुपारी ५८ ते ७१ टक्के राहण्याची शक्यता आहे. तसेच विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ERFS) १८ ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कोकण विभागातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या भात आणि नागली पिकांची काढणी व मळणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी कोरड्या हवामानाचा फायदा घेऊन ही कामे वेळेत पूर्ण करावीत. काढणी केलेले धान्य योग्य प्रकारे वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावे, जेणेकरून धान्याचे नुकसान होणार नाही. खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाल्यानंतर जमिनीत उपलब्ध असलेल्या ओलाव्याचा विचार करून हरभरा, वाल यांसारख्या रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन करावे. जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजीपाला पिकांना पिकांची अवस्था आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. आंबा, काजू, चिकू, नारळ आणि सुपारीच्या फळबागांमध्ये झाडांच्या आळ्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पालापाचोळा किंवा सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. आंबा बागांमध्ये नवीन पालवीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागांचे नियमित निरीक्षण करावे. सकाळच्या वेळी भाजीपाला आणि फळबागांमध्ये आर्द्रता अधिक असल्याने बुरशीजन्य रोगांची लक्षणे आढळतात का, याकडेही लक्ष द्यावे.
रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता लहान वासरे, आजारी जनावरे आणि कुक्कुटपालनातील लहान पक्ष्यांची विशेष काळजी घ्यावी. जनावरांना थंड वाऱ्यापासून संरक्षण मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. बदलत्या हवामानात पशुधनाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.डॉ. विलास जाधव, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर प्रमुख.