पालघर शहर: भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या हवामान अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यामध्ये ३ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधी दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत किमान व कमाल तापमान सरासरी सरासरी एवढेच राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ३ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधी दरम्यान मध्यम स्वरूपात म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान किमान व कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी राहील.
सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा म्हणजेच १० ते १७ सप्टेंबर आणि चौथा आठवडा १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भातपीक फुटवे ते पोटरी अवस्थेत आहे, पुढील ५-६ दिवस हलक्याच पावसाची शक्यता असल्यामुळे भातशेताची बांध बंधिस्ती करून पाणी ५-१० सेमी इतकी पाण्याची पातळी नियंत्रित करावी. पाण्याचा ताण बसत असेल तर बाहेरील स्रोतातून पाणी द्यावे. गरजेनुसार तण नियंत्रण करावे.
नियमितपणे पिकांचे निरीक्षण करून कीड व रोगाचे व्यवस्थापन करावे, असा सल्ला शेतकऱ्यांना जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल पालघर मार्फत देण्यात आला आहे.