Vaitarna Bridge Accident Pudhari
पालघर

Vaitarna Bridge Accident: वैतरणा पुलावरील दुरुस्ती कामात निष्काळजीपणा बॅरिकेडला धडकून टेम्पोचा अपघात; चालक किरकोळ जखमी

पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी मार्गिका बंद; अंधारात अडथळ्याचा अंदाज न आल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील टेन गावाच्या हद्दीत वैतरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे टेम्पोचा अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

दुरुस्ती कामासाठी गुजरात मार्गिकेवरील वाहतूक बंद करण्यासाठी उभारण्यात आलेल्या अडथळ्याला भरधाव टेम्पो धडकल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वैतरणा नदीवरील पुलाच्या गुजरात मार्गिकेवर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. कामाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन करताना संबंधित ठेकेदाराकडून पुलावरील मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र, पहाटेच्या वेळी अंधारात अचानक समोर आलेल्या अडथळ्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट बॅरिकेडला धडकला.

अपघातानंतर महामार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुलाच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने वाहतूक वळवण्यासाठी पुरेशा प्रमाणात बॅरिकेडिंग केले नसल्याचा तसेच धोक्याची सूचना देणारे फलक, रिफ्लेक्टर आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप समाजसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महामार्गासारख्या अतिवर्दळीच्या मार्गावर दुरुस्तीची कामे करताना वाहनचालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असताना योग्य नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी दखल घेऊन अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT