Mangaon Muddy Water: माणगावात जलशुद्धीकरण केंद्र तरीही गढूळ पाणी!

काळनदीच्या मातीमिश्रित पाण्यामुळे नागरिक त्रस्त; पाणीपुरवठा विभागाची तातडीची विशेष बैठक
Mangaon Muddy Water
Mangaon Muddy WaterPudhari
Published on: 
Updated on: 

अरुण पवार

माणगाव: माणगाव शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या पाणीप्रश्नाने पुन्हा एकदा चिंता निर्माण केली आहे. शहरात जलशुद्धीकरण केंद्र कार्यरत असतानाही काही वेळा नळाला मातीमिश्रित, गढूळ रंगाचे पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विशेषतः महिलावर्गातून याबाबत तीव्र चिंता व्यक्त होत असून, पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांना वेळीच माहिती देणे आवश्यक असल्याची मागणीही होत आहे.

सध्या माणगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, काळनदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात माती व गाळ मिसळल्याने नदीचे पाणी लालसर व गढूळ झाले आहे. हे पाणी जॅकवेलमधून उपसा करून उतेखोल येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. येथे तुरटी व टीसीएल पावडरीचा वापर तसेच फिल्टरेशन प्रक्रियेद्वारे पाणी शुद्ध करून पुढे नागरिकांना पुरवठा केला जातो.

Mangaon Muddy Water
Mangaon Cattle Theft: माणगावमध्ये गुरेचोरांचा धुमाकूळ !चार गुरे चोरीला, शेतकऱ्यांमध्ये संताप

मात्र, नदीच्या पाण्यात अचानक मोठ्या प्रमाणात गाळ मिसळल्यास शुद्धीकरण प्रक्रियेवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे काही वेळा नळाला गढूळ पाणी येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. माणगाव शहराला दररोज जवळपास ३५ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. जलशुद्धीकरणानंतर पाणी तीन मोठ्या साठवण टाक्यांमध्ये जमा केले जाते आणि त्यानंतर नऊ पाइपलाइनद्वारे तीन पाळ्यांमध्ये नागरिकांच्या नळजोडण्यांना पाणीपुरवठा केला जातो.

मात्र, पावसाळ्यात नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत होणारे बदल, तांत्रिक अडचणी तसेच वीजपुरवठ्यातील खंड किंवा कमी-जास्त दाब याचा परिणाम पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर होतो. या सर्व अडचणींवर मात करून नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सतत प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

माणगावातच जलशुद्धीकरण केंद्र; तालुक्यातील बहुतांश गावे मात्र थेट स्रोतांवर अवलंबून- माणगाव तालुक्यात माणगाव आणि भिरा पावर हाऊस येथे जलशुद्धीकरण केंद्र कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. तालुक्यातील उर्वरित ७४ गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४०० गावांमध्ये नदी, तलाव आणि विहिरी यांसारख्या स्थानिक जलस्रोतांवर आधारित पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत.

त्यामुळे पावसाळ्यात जलस्रोतांमध्ये गाळ व माती मिसळण्याची समस्या केवळ माणगाव शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही चिंतेचा विषय ठरू शकते. गढूळ पाण्याच्या समस्येची दखल घेत माणगाव नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती अजित चंद्रकांत तार्लेकर यांनी संबंधित पाणीपुरवठा कर्मचारीवर्गाची उतेखोल जलशुद्धीकरण केंद्रात बुधवार, २३ सप्टेंबर रोजी स. ९.३० वा. तातडीची विशेष बैठक घेतली. या वेळी नगरपंचायतीचे कनिष्ठ अभियंता आकाश बुवा उपस्थित होते.

Mangaon Muddy Water
Kalamboli Belapur Traffic Jam: गणेशभक्तांच्या परतीने महामार्ग जाम! कळंबोली ते बेलापूर वाहनांच्या लांबच लांब रांगा

बैठकीत पाणीशुद्धीकरण प्रक्रियेत आवश्यक ती विशेष काळजी घेण्याच्या तसेच नागरिकांना शक्य तितके स्वच्छ व शुद्धपाणी उपलब्ध करून देण्यासाठी दक्षता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याबाबतही कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

नळांचे पाणी स्वच्छ, शुद्ध हवे- नागरिकांची अपेक्षा

पाणी हा प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याशी थेट जोडलेला विषय आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र कार्यरत असतानाही नागरिकांना गढूळ पाणी मिळणे ही बाब गांभीर्याने घेऊन शुद्धीकरण प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांना पारदर्शकपणे माहिती द्यावी, अशी अपेक्षा माणगावकरांकडून व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news