

ठाणे: शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन चिमुकल्या बहिणींचा शोध दुसऱ्या दिवशी जोगिला तलावात संपला. गुरुवारी सकाळी घरातून निघाल्यानंतर शाळेत न पोहोचलेल्या या बहिणींचे मृतदेह शुक्रवारी सकाळी उथळसर येथील जोगिला तलावात आढळून आले.
दोन्ही मुली तलावापर्यंत कशा पोहोचल्या आणि त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवारी सकाळी त्या टेंभी नाका येथील महापालिकेच्या शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्या. मात्र, दुपारी १२ वाजून गेले तरी त्या घरी परतल्या नाहीत. काळजीत पडलेल्या पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता दोन्ही मुली शाळेत आल्याच नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यानंतर पालकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
मुलींचा शोध सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी जोगिला तलावात दोघींचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, राबोडी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी बचावकार्य राबवत तलावातून दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढले. काही तासांपूर्वी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या बहिणींचा अशा अवस्थेत मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
दोन्ही मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दोन्ही मुली तलावात कशा पोहोचल्या, त्या अपघाताने तलावात पडल्या की या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याचा राबोडी पोलीस तपास करीत आहेत.