Palghar Train Accident Pudhari
पालघर

Palghar Train Accident: पालघरमध्ये मालगाडीची धडक; तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

पोलिसांच्या पाठलागाच्या भीतीने रेल्वे ट्रॅकवरून पळताना अपघात; नातेवाइकांचा गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला जुना पालघर येथील जैन मंदिरासमोर मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वप्निल शैलेश पालांडे (23), कुणाल कुमार दुबळा (23) आणि अफरोज खलील शेख (28) अशी या तरुणांची नावे असून तिघेही पालघर पूर्वेकडील वीरेंद्र नगर परिसरातील रहिवासी होते. शुक्रवारी रात्री साध्या वेषातील पोलिसांनी पाठलाग केल्याने हे तरुण घाबरून पळत सुटले आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने त्यांना चिरडले.

पालघर पूर्व भागातील वीरेंद्र नगर येथे राहणारे स्वप्नील शैलेश पलांडे, कुणाल कुमार दुबळा आणि अफरोज खलील शेख ह्या तिघांना साध्या वेशातील पोलिसांनी पकडून मारहाण केली. ही तिन्ही मुले पोलिसांच्या हातून निसटली आणि पळू लागली. पोलिसही त्यांच्या मागे पळत होते. तिघे तरुण पालघर जैन मंदिराच्या जवळील रेल्वे ट्रॅकवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतानाच मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या

एका मालगाडीखाली ते सापडले, आमच्या मुलाच्या मृत्यूस पोलिसच कारणीभूत असल्याचा आरोप तरुणांच्या नातेवाइकांनी केला आहे. मात्र, वीरेंद्र नगरकडे जात असताना जैन मंदिराजवळील एका भिंतीमधील फटीमधून रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना तिघांचा अपघात झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे ते म्हणाले.

तिघा तरुणांपैकी कुणाल दुबळा याच्या नावावर फक्त एक गुन्हा असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली. या घटनेमुळे पालघर पूर्वेतील परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मृतकांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT