

500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त 2 बीएचके सदनिका मालकी तत्त्वावर विनामूल्य वितरित केली जाणार आहे.
इमारतींमध्ये दोन पॅसेंजर लिफ्ट, एक फायर लिफ्ट, सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत 3 मजल्यांचे बेसमेंट पार्किंग, स्टील्ट एरिया आणि प्रशस्त जिने आहेत.
या प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींच्या सामायिक सोयीसुविधांची म्हाडातर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार आहे हे विशेष.
मुंबई : 160 चौरस फुटांच्या खोलीत आयुष्य काढलेली नायगावच्या बीडीडी चाळीतील कुटुंबे सोमवारी म्हणजे गुढीपाडव्याच्या तीन दिवस आधीच नव्या टॉवरमधील आपल्या प्रशस्त घरांचा ताबा घेतील.
आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पाच इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतींतील पात्र रहिवाशांना सोमवारी सकाळी 10 वाजता, नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकांचे वितरण केले जाईल. या प्रकल्पाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नाव देण्यात आले आहे.
या प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतीत एकूण 20 टॉवर बांधण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्याअंतर्गत पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील एकूण 8 टॉवर्सपैकी 5 टॉवर्समधील 864 सदनिकांचे वितरण सोमवारी होईल. या सदनिकांमध्ये निवृत्त पोलीस, त्यांचे वारस व कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या 423 सदनिकांचा समावेश आहे. उर्वरित 537 सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून एप्रिल 2026 मध्ये हे काम पूर्ण होईल.
सोमवारच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर, मंत्री उपस्थित राहणार आहेत.