पालघर ः पालघर शहराचे सौंदर्य वाढवण्यासह पर्यावरण संवर्धनात भर घालण्यासाठी 99 हेक्टरच्या विस्तीर्ण क्षेत्रात इको पार्क उभारले जाणार आहे.नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वाकांक्षी पालघर इको पार्क प्रकल्पाचे राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत प्रकल्पाची विधिवत पायाभरणी करण्यात आली.
नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी जॉगिंग आणि वॉकिंग ट्रॅक, कमी जागेत घनदाट वृक्षराजी निर्माण करणारे मियावाकी घनवन आणि मानसिक शांततेसाठी विशेष योग साधना मंच अशा अत्याधुनिक सुविधा इको पार्क मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तसेच बँबुसेटम च्या माध्यमातून बांबूच्या विविध प्रजातींचे जतन, स्थानिक वनस्पती आणि प्राणी यांची ओळख, तसेच स्थानिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विशेष विभाग विकसित केले जातील.
पालघर इको पार्क एक उद्यान नसून ते आरोग्यासाठी आणि निसर्ग शिक्षणासाठी एक परिपूर्ण संकुल असणार आहे. पालघरकरांसाठी निसर्गाच्या सान्निध्यात एक हक्काचे विरंगुळा केंद्र ठरेल तसेच शहराचे ग्रीन लंग्सम्हणून कार्य करेल, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. वन विभागाच्या डहाणू उपवन संरक्षक कार्यालया मार्फत साकारला जाणारा इको पार्क प्रकल्प पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वन परिक्षेत्र क्रमांक 131 मध्ये स्थित आहे. एकूण 99 हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रातील प्रकल्पासाठी अंदाजे 134 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.2025-26 ते 2027-28 या तीन वर्षाच्या कालावधीत तीन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वेगाने शहरीकरण होत असलेल्या पालघर शहरात पर्यावरणीय समतोल राखणे आणि नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निसर्गाचा अनुभव देण्याचे उद्दिष्ट आहे.
पालघर ग्रीन पार्क प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालघरच्या नागरिकांना निसर्गाशी जोडले जाण्याची संधी मिळेल आणि त्यांच्यात निसर्गाप्रती आपुलकीची भावना वाढीस लागेल, असा वनविभागाचा मानस आहे. यावेळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक (ठाणे) एन. आर. प्रवीण आणि उपवनसंरक्षक (डहाणू) निरंजन दिवाकर यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.