

Pudhari News Network: शुभम साळुंके
दिवाळीत प्रदूषणाचा आलेख हा झपाट्याने वाढत असतो. मात्र वर्षानुवर्षे बांबूच्या साहाय्याने तयार केली जाणारी फटांगरी आज दिसेनाशी झाली आहे. प्रदूषणावर मात कारण्यासाठी व कोणालाही त्रास होणार नाही अश्या कमी आवाजाच्या फटांगरीला एरव्ही बाजारात मोठी मागणी असायची. मात्र आता मोठमोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी बाजारपेठेत प्रवेश करून नागरिकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे. त्यामुळे आता बांबूपासून तयार होणारी फटांगरी कालबाह्य होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
शालेय परीक्षा आल्या की ग्रामीण भागात दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना किल्ले आणि फटांगरी बनविण्याचे वेध लागत असत. मात्र आता मातीच्या किल्ल्यांची जागा ही प्लास्टर ऑफ पॅरिसने घेतली आहे. तर बांबूच्या सहाय्याने तयार होणारी फटांगरीची जागा ज्वलंत आणि मानवी आरोग्यास तसेच वन्य जीवांसाठी हानिकारक असलेल्या फटाक्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. एका बांबूपासून सुमारे दहा ते पंधरा फटांगऱ्या तयार केल्या जात असतात. बांबूची लाकडी फटांगरी बनविली जाते. त्यानंतर शेताच्या बांधांवर आणि माळरानावर येणाऱ्या गोल आकाराच्या गोळ्या त्यांना चोपड असं म्हणतात. त्या गोळ्या फटांगरीमध्ये टाकल्यानंतर फटाक्यासारखा आवाज येत असतो. मात्र आता बदलत्या काळानुसार हे प्रदूषण मुक्तीचे संदेश देणारे फटाके कालबाह्य होत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे शहरी भागात या फटांगऱ्यांना मोठी मागणी असायची. कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगरच्या कॅम्प पाच परिसरात ग्रामीण भागातून फटांगरी आणि तिच्या गोळ्या विक्रीसाठी येत असत. तर कल्याणच्या आचार्य अत्रे रंग मंदिर परिसरात तर डोंबिवलीच्या शास्त्री नगर परिसरात विक्रीसाठी उपलब्ध असायचे. मात्र, आता बदलत्या काळानुसार फटांगरी शहरी भागातून हद्दपार झालीच आहे. मात्र आता ग्रामीण भागातून देखील हद्दपार होत असल्याचे दिसून येत आहे.
फटांगरीकडे दुर्लक्ष
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळासह सरकार सातत्याने प्रयत्न करत असत. तालुका स्तरावर महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत. शासनाने प्रोत्साहन दिले असते, तर बाजारातून प्रदूषणमुक्त फटांगरी लुप्त झालेली पुन्हा एकदा आणण्याची संधी होती. मात्र राजकीय नारेबाजीत आणि प्रदूषणमुक्तीच्या फटांगरीकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले आहे.
प्रदूषणमुक्तीचे संदेश
दिवाळीच्या सुट्टीत फटांगरी बनवण्याचे वेड हे तरुणांना लागत असे. मात्र फटांगरीपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांनी बाजारात प्रवेश केल्याने आता फटांगरी मात्र कालबाह्य होत चालली आहे. त्यामुळे आता बदलत्या जीवनशैलीत शासन प्रदूषण मुक्तीचे संदेश देत आहे. मात्र हेच संदेश शेतकऱ्यांनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांच्या जन्माआधी दिले असल्याचे जुने जाणकार सांगत आहेत.