Palghar Temperature Rise Pudhari File Photo
पालघर

Palghar Temperature Rise: पालघरमध्ये तापमानात 3-4 अंशांची वाढ; उष्ण व दमट वातावरणाचा इशारा

15 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान 36°C पर्यंत जाण्याचा अंदाज; आंबा, काजू, केळी व चिकू बागायतदारांना कृषी विभागाचे मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर : पालघर जिल्ह्यात येत्या दिवसांमध्ये सरासरी कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबईद्वारे जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून यामुळे जिल्हा वासियांना येत्या दिवसात उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत.

पालघर जिल्ह्यात 15 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान अनुक्रमे 33, 34, 35,35 व 36 अंश सेल्सियस आणि किमान तापमान अनुक्रमे 14, 15, 17, 18 व 18 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात व्यक्त करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी रोजी वातावरण अंशत ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेतही वाढ होवून 85 ते 100% व दुपारची सापेक्ष आर्द्रता 42 ते 48% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याची गती 3 ते 8 किलोमीटर प्रतितास एवढी राहील.

या सर्व हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात उष्ण व दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात सलग पुढील दोन आठवडे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असून किमान तापमान सरासरी एवढे किंवा सरासरी पेक्षा कमी राहणार आहे. तापमानात वाढ होत असल्याने फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, काजू, केळी व चिकू शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळ बागांना गरजेनुसार नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी, पाणी देण्यासाठी शक्यतो संध्याकाळची किंवा सकाळची वेळ निवडावी.

तसेच झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. नवीन लागवड केलेल्या रोपांची कडक उन्हामळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी. पाण्याची कमतरता असल्यास सिंचन व्यवस्थापनासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा. वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र कोसबाड हिल, पालघर मार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT