कासा : पालघर जिल्हा विविध विकास प्रकल्पांमुळे विकासाच्या प्रवाहात येत असल्याचे चित्र निर्माण केले जात असले, तरी आजही जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात मूलभूत सुविधांची मोठी वानवा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पाणी, रस्ते, वीज यांसह अनेक प्रश्नांशी येथील नागरिकांना आजही झुंज द्यावी लागत आहे. विकासाच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होत असतानाही डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी कातकरी कुटुंबाला मृत्यूनंतरही मरणयातना सहन करण्याची वेळ आली आहे.
धुंदलवाडी परिसरातील नदीवर अद्याप पूल नसल्याने एका कातकरी कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी नातेवाईकांना भर पाण्यातून धोकादायक नदी पार करावी लागली. पावसामुळे नदीला आलेल्या पुरातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाच्या विकासकामांवर आणि स्थानिक सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
परिसरात पक्क्या रस्त्याची सुविधा नसल्याने पावसाळ्यात कच्च्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होतो. त्यामुळे अंत्ययात्रेसाठी नातेवाईकांना सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतर चिखल तुडवत पायी जावे लागते. नदीवर पूल नसल्याने पुढील प्रवासासाठी भर पाण्यातून नदी पार करण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्मशानभूमी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले, तरी पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकूड उपलब्ध होत नसल्याने मृतदेह दफन करण्याची वेळ येत असल्याचे मयताच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने केवळ स्मशानभूमी उपलब्ध असल्याचे सांगण्यापेक्षा पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, याबाबत स्थानिक सरपंच यांच्याशी विचारणा केली असता, परिसरातील स्मशानभूमी सुस्थितीत असून तेथे जाण्यासाठी खडीकरण केलेला रस्ता असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कुटुंबाने घटनेपूर्वी ग्रामपंचायतीला माहिती दिली असती, तर अंत्यसंस्कारासाठी लाकडांची व्यवस्था करून दिली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, एखादी दुर्घटना किंवा अडचणीची घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे लक्ष या समस्यांकडे जाते, अशी नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मूलभूत सुविधांची वानवा
पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये आजही रस्ते, पूल, वीज, पाणी आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे अशा घटनांमधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला सन्मानाने अंतिम निरोप देण्यासाठीही जर कुटुंबीयांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालावा लागत असेल, तर या भागातील विकासकामांचे नियोजन नेमके कोणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. धुंदलवाडी परिसरातील नदीवर कायमस्वरूपी पूल उभारावा, रस्ता पक्का करावा तसेच पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.