

मुंबई : व्यावहारिक मराठीचे ज्ञान नसल्यास व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित, तसेच पुढील तीन महिन्यांत ज्ञान न आल्यास परवाना कायमचा रद्द करण्याची कायद्यात तरतूद असल्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये विविध महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी, तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ॲपआधारित मोटार कॅब आणि त्यांच्या परवाना व अधिकृततेशी संबंधित चालक, तसेच परमिटधारकांसाठी व्यावहारिक मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.
मराठी भाषेचे ‘ज्ञान’ अनिवार्य
संबंधित अधिकृततेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक पात्रतेसोबत मराठी भाषेचे कार्यकारी अर्थात व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.
ॲपआधारित इलेक्ट्रॉनिक मोटार कॅबसाठी स्वतंत्र तरतूद
नियम २२ मध्ये बदल करून ॲपआधारित इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकाला मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक राहणार आहे. अधिकृत चालकाकडे आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळून आल्यास, नियमांचे पालन न केल्याबद्दल परवाना प्राधिकरणाला लेखी कारणे नोंदवून संबंधित चालकाविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
परमिटधारकासाठीही मराठीची अट
नव्या तरतुदीनुसार, संबंधित परमिटधारकाकडे मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.
नूतनीकरणासही व्यावहारिक मराठी आवश्यक
ॲपआधारित इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या मोटार कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करताना परमिटधारकाकडे मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.